श्रमिकांचा आधार असलेल्या ‘महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी’ (मनरेगा) योजनेला केंद्र सरकारने खीळ घातली असून, भाजपने गरिबांच्या पोटावर लाथ मारली आहे, असा घणाघाती आरोप महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला.

शिवमोगा येथे प्रसारमाध्यमांशी बोलताना मंत्री हेब्बाळकर म्हणाल्या की, “एखाद्या योजनेचे स्वरूप बदलताना केंद्र सरकारने घटक राज्यांशी चर्चा करणे अपेक्षित होते. मात्र, कोणालाही विश्वासात न घेता मनरेगाची जागा आता दुसऱ्याच योजनेने घेतली आहे. ग्रामपंचायतींचे अधिकार हिरावून घेऊन दिल्लीतून निर्णय लादले जात आहेत. या अन्यायाविरोधात देशातील ६ कोटी कुटुंबांच्या वतीने काँग्रेस देशव्यापी आंदोलन छेडणार आहे.”
बेळगावच्या चोर्ला घाटात २ हजार रुपयांच्या नोटांच्या स्वरूपात सुमारे ४०० कोटी रुपये सापडल्याच्या प्रकरणावर भाष्य करताना त्या म्हणाल्या, “बेळगाव पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत, मात्र महाराष्ट्राकडून अपेक्षित सहकार्य मिळत नाहीये. हा पैसा गुजरातहून आल्याची चर्चा आहे. ‘कोहळा चोरीला गेला’ म्हटल्यावर भाजपने खांदे का शिवशिववावेत? या पैशांचा मालक कोण हे समोर आलेच पाहिजे.”
भाजपच्या टीकेला उत्तर देताना हेब्बाळकर म्हणाल्या की, “भाजपने देश अदानी-अंबानींच्या घशात घातला असून त्यांचे २३ हजार कोटींचे कर्ज माफ केले आहे. कर्नाटकात ४०% कमिशन खाणारे आणि ज्यांचे मुख्यमंत्री तुरुंगात जाऊन आले आहेत, अशा भाजपने आम्हाला भ्रष्टाचारावर शिकवू नये. त्यांची नैतिक पात्रता संपली आहे.”


Recent Comments