बेळगाव तालुक्यातील बडेकोळ्ळमठ जवळील राष्ट्रीय महामार्गावर आज पहाटे वाहनांचा विचित्र अपघात झाला. अनेक मोठ्या वाहनांची एकमेकांना धडक बसूनही सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही, त्यामुळे मोठी दुर्घटना टळली आहे.

बेळगाव तालुक्यातील हिरेबागेवाडी पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत बडेकोळ्ळमठ जवळ ही घटना घडली. कपड्यांनी भरलेल्या एका कंटेनरला दुसऱ्या वाहनाने पाठीमागून जोरदार धडक दिली, ज्यामुळे कंटेनर रस्त्यावरच पलटी झाला. याच दरम्यान पाठीमागून येणारा इंडियन ऑइलचा तेलवाहू टँकर चालकाचा ताबा सुटल्याने सर्व्हिस रस्ता ओलांडून थेट शेतात घुसला. शेतात घुसण्यापूर्वी या टँकरची विद्युत खांबालाही धडक बसली. या धडकेत टँकरच्या दर्शनी भागाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून, टँकरमधील दोन जण किरकोळ जखमी झाले आहेत.
टँकरमध्ये इंधन असल्याने खबरदारीचा उपाय म्हणून अग्निशमन दलाच्या जवानांनी तातडीने घटनास्थळी धाव घेऊन पाचारण केले आहे. जखमींना तात्काळ स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. घटनेची माहिती मिळताच हिरेबागेवाडी पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. अपघातामुळे राष्ट्रीय महामार्गावरील वाहतूक काही काळ विस्कळीत झाली होती, मात्र पोलिसांनी क्रेनच्या साहाय्याने वाहने बाजूला करून वाहतूक सुरळीत केली.


Recent Comments