गेल्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात चोर्ला घाटात ४०० कोटी रुपयांच्या जुन्या नोटांचे दोन कंटेनर लुटल्याच्या प्रकरणाला आता नवे वळण मिळाले आहे. बेळगाव जिल्हा पोलीस अधीक्षकांनी केलेल्या आवाहनानुसार, याप्रकरणी अधिकृत तक्रार दाखल करण्यास आपण तयार असल्याचे संदीप पाटील यांनी स्पष्ट केले असून कर्नाटक पोलिसांनी हा संपूर्ण प्रकार उघडकीस आणावा, अशी विनंती केली आहे.

कर्नाटक-गोवा सीमेवरील चोर्ला घाटात घडलेल्या या खळबळजनक दरोड्याबाबत संदीप पाटील यांनी नाशिकमध्ये पत्रकारांशी संवाद साधला. आपल्या अपहरणासंदर्भात नाशिक पोलीस योग्य तपास करत असून, जर कर्नाटक पोलीस चोर्ला घाटातील लुटीचा तपास करणार असतील तर आपण तिथेही फिर्याद देण्यास सज्ज असल्याचे त्यांनी सांगितले. जयेश कदमने दिलेल्या माहितीनुसार, ही लूट कर्नाटकच्या हद्दीतच झाली असून ४०० कोटींची ही रक्कम बालाजी ट्रस्टकडे नेली जात होती, असे संदीप पाटील यांनी म्हटले.
या प्रकरणाचे धागेदोरे गुजरातपर्यंत पोहोचले असून तेथील एका आश्रमातून दोन हजार रुपयांच्या जुन्या नोटा बदलून घेण्यासाठी ही रक्कम तिरुपतीला पाठवली जात होती. १६ ऑक्टोबर २०२५ रोजी चोर्ला घाटातून हे दोन कंटेनर गायब झाले होते. या प्रकरणात विराट गांधी, विशाल नायडू, जयेश कदम आणि सुनील धुमाळ यांची नावे चर्चेत आहेत.
विराट गांधी याने हा सर्व कट रचल्याचे जयेश कदमने आपल्याला सांगितले असून, त्यानंतर किशोर सावळा याने अरजीतला अमली पदार्थ तस्करीच्या खोट्या गुन्ह्यात दुबईत अडकवले, असा खुलासाही संदीप पाटील यांनी केला. या व्यवहारात दुबईतील अरजीत आणि विराटचा मित्र सय्यद अझर यांनी कंटेनर पाठवण्यास मदत केली होती. ही रक्कम सिल्वासा येथून तिरुपतीला नेण्यात येत असताना ही लूट झाल्याचे संदीप पाटील यांनी स्पष्ट केले.


Recent Comments