Bagalkot

बागलकोटमध्ये ‘व्होट चोरी’चा धुरळा; ३ हजार विद्यार्थ्यांची बोगस मतदार नोंदणी केल्याचा काँग्रेसचा आरोप

Share

बागलकोट विधानसभा पोटनिवडणुकीच्या तोंडावर राजकीय वातावरण तापले असून माजी आमदार वीरण्णा चरंतीमठ यांच्या शिक्षण संस्थेतील विद्यार्थ्यांची अवैधपणे मतदार नोंदणी केल्याचा गंभीर आरोप काँग्रेसने केला आहे. याप्रकरणी जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार दाखल करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.

बसवेश्वर विद्यावर्धक शिक्षण संस्थेच्या अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि नर्सिंग महाविद्यालयांतील ३ हजारहून अधिक विद्यार्थ्यांची नावे नियमबाह्य पद्धतीने मतदार यादीत समाविष्ट केल्याचा काँग्रेस नेत्यांचा मुख्य आरोप आहे. इतर जिल्हा आणि राज्यांतून शिक्षणासाठी आलेल्या या विद्यार्थ्यांना शहरातील बूथ क्रमांक ११० ते ११४ मधील एकूण १० बूथमध्ये मतदार म्हणून नोंदवण्यात आल्याने नवा वाद निर्माण झाला आहे.

या नोंदणी प्रक्रियेत मोठा घोळ झाल्याचा दावा करत वसतिगृहाचा पत्ता देताना तरुण आणि तरुणींना एकच खोली क्रमांक देण्यात आल्याची टीका काँग्रेसने केली आहे. एकाच खोलीत तरुण आणि तरुणी एकत्र कसे राहू शकतात, असा प्रश्न उपस्थित करत निवडणुकीत विजयासाठी विद्यार्थ्यांवर दबाव टाकला जात असल्याचा संताप काँग्रेसने व्यक्त केला आहे. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.

Tags: