Bailahongala

बैलहोंगलमध्ये भटक्या कुत्र्यांचा हैदोस; सात जण जखमी, चिमुकलीची प्रकृती गंभीर

Share

बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल येथे भटक्या कुत्र्यांचा सुळसुळाट झाला असून एकाच दिवशी सात जणांवर कुत्र्यांनी हल्ला चढवला आहे. किराणा दुकानात जाणाऱ्या सात वर्षांच्या बालिकेवर कुत्र्याने हल्ला केल्याने परिसरात तीव्र संताप व्यक्त होत आहे.

बैलहोंगल शहरातील एम.जी. हौसिंग कॉलनीमध्ये ही धक्कादायक घटना घडली. येथील रहिवासी सुप्रिया पाटील (७) ही बालिका किराणा दुकानात जात असताना भटक्या कुत्र्याने तिच्यावर अचानक हल्ला केला. या भीषण हल्ल्यात बालिकेच्या डोक्याला, हाताला आणि पायाला गंभीर जखमा झाल्या आहेत. तिला तातडीने स्थानिक सरकारी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र जखमा खोल असल्याने पुढील उपचारासाठी बेळगावच्या खासगी रुग्णालयात हलवण्यात आले आहे. केवळ ही बालिकाच नव्हे, तर एकाच दिवसात शहरातील विविध भागात एकूण सात जणांना कुत्र्यांनी चावा घेतल्याने नागरिकांमध्ये घबराट पसरली आहे.

शहरातील के.सी. नगर, इंदिरा नगर यासह प्रमुख गल्ल्यांमध्ये भटक्या कुत्र्यांची संख्या वाढली असतानाही नगरपालिका अधिकारी कोणतीही कारवाई करत नसल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. सतत हल्ले होत असूनही स्थानिक प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची तक्रार रहिवासी करत आहेत. बैलहोंगल पोलीस ठाण्याच्या व्याप्तीत या घटनांची नोंद झाली असून, कुत्र्यांचा बंदोबस्त न केल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा स्थानिकांनी दिला आहे.

Tags: