वनसंपदेने नटलेल्या खानापूर तालुक्यातील निसर्ग सौंदर्याची भुरळ पर्यटकांना पडत असतानाच, खानापूर-गोवा मार्गावर प्रवाशांना रानगव्यांचे दर्शन झाले असून हे दुर्मिळ दृश्य सध्या चर्चेचा विषय ठरत आहे.
निसर्गाच्या कुशीत वसलेल्या खानापूर तालुक्याचे सौंदर्य न्यारेच आहे. खानापूरहून गोव्याला जाणाऱ्या एका पर्यटकाला नुकतेच रानगव्यांचे दर्शन झाले. हेम्मडगा रस्त्यावरील दाट जंगलात रानगव्यांचा कळप दिसून आला असून हे दृश्य आता सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.
खानापूर येथील रहिवासी मोजम्मिल काझी हे गोव्याला जात असताना हेम्मडगा रस्त्यावर त्यांना हे आश्चर्यकारक दृश्य दिसले. दाट झाडीतून रस्ता ओलांडणाऱ्या आणि परिसरात विहरणाऱ्या रानगव्यांना पाहून मुझम्मिल यांनी तात्काळ आपल्या मोबाईलमध्ये हे दृश्य टिपले. निसर्गाच्या शांत वातावरणात वन्यप्राण्यांचा हा मुक्त संचार पाहणाऱ्यांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारा आहे.
खानापूर तालुका आपल्या विस्तीर्ण वनक्षेत्रासाठी प्रसिद्ध असून येथील पर्यावरण वन्यजीवांसाठी नंदनवन ठरत आहे. पर्यटकाने टिपलेला हा व्हिडिओ ‘इन न्यूज’च्या प्रेक्षकांसाठी खास शेअर करण्यात आला असून, हा व्हिडिओ वनसौंदर्य आणि वन्यजीव संरक्षणाचे महत्त्व अधोरेखित करत आहे. अशा प्रकारे रानगव्यांचे प्रत्यक्ष दर्शन होणे हा एक दुर्मिळ अनुभव असल्याची भावना पर्यटकांनी व्यक्त केली आहे.


Recent Comments