खानापूर तालुका पंचायत सभागृहात पार पडलेल्या पंच गॅरंटी योजनांच्या अंमलबजावणी प्राधिकरणाच्या मासिक बैठकीत रेशन कार्ड वाटपातील कथित गैरव्यवहारावरून सदस्यांनी अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले.

खानापूर तालुका पंचायत सभागृहात आयोजित या बैठकीत अधिकाऱ्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. सभेचे अध्यक्ष सूर्यकांत कुलकर्णी, सदस्य इसाक खान पठाण आणि रुद्रप्पा पाटील यांनी अन्नभाग्य योजनेतंर्गत नवीन रेशन कार्ड वाटपात झालेल्या कथित गैरप्रकारांबाबत अन्न नागरी पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांना जाब विचारला. कोणतीही योग्य पडताळणी न करता आणि प्राधिकरणाला अंधारात ठेवून सुमारे ५४० रेशन कार्डांचे वाटप करण्यात आले आहे. या प्रक्रियेत ऑनलाइन अर्जदार, दुकान मालक आणि अधिकारी यांच्यात संगनमत झाल्याची शंका सदस्यांनी व्यक्त केली.
नवीन रेशन कार्ड मिळवलेल्या लाभार्थ्यांची गाववार यादी देण्याबाबत लेखी नोटीस देऊनही अधिकाऱ्यांनी केवळ सांख्यिकी माहिती सादर केल्याने सदस्य अधिक आक्रमक झाले. या प्रकरणाची वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे तक्रार करून पुनर्रचना करण्याची मागणी करण्यात आली.
युवा निधी योजनेचे अधिकारी बैठकीस सातत्याने अनुपस्थित राहत असल्याबद्दल तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. निलंबित सीडीपीओंच्या जागी नियुक्त झालेल्या नवीन अधिकाऱ्यांनी पूर्ण माहितीसह उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले. गृहज्योती योजनेच्या प्रगतीबाबत अधिकारी प्रवीण बरगाल यांनी माहिती दिली. या बैठकीला प्राधिकरणाचे सचिव रमेश मेत्री, सदस्य प्रकाश मादार, बाबू हत्तरवाड, युसूफ हरगी, संजय गावडे, प्रियांका गावकर, जगदीश पाटील यांच्यासह विविध विभागांचे तालुकास्तरीय अधिकारी उपस्थित होते.


Recent Comments