विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील हलसंगी गावात प्रजासत्ताक दिनी भरदिवसा पडलेल्या दरोड्याच्या तपासात आता एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. दरोडेखोरांनी आधी दुसऱ्या दुकानाचा कट रचला होता, मात्र गर्दीमुळे त्यांनी आपले लक्ष्य बदलल्याचे सीसीटीव्ही फुटेजवरून स्पष्ट झाले आहे.

विजापूर जिल्ह्यातील चडचण तालुक्यातील हलसंगी गावात प्रजासत्ताक दिनी बुलेटवरून आलेल्या दोन दरोडेखोरांनी पिस्तूलचा धाक दाखवून सराफी दुकान लुटले होते. यावेळी प्रतिकार करणाऱ्या एका तरुणाच्या पायावर गोळी झाडून आरोपी महाराष्ट्राच्या दिशेने पसार झाले होते. आता या प्रकरणात नवीन वळण मिळाले असून दरोडेखोरांनी प्रत्यक्षात ज्या दुकानावर दरोडा टाकायचा ठरवले होते, त्याऐवजी दुसऱ्याच दुकानात लूट केली आहे.
हलसंगी गावातील सराफी दुकान दरोडा प्रकरणाच्या तपासात धक्कादायक माहिती उघड झाली आहे. दरोडेखोर ज्या दुकानावर दरोडा टाकण्यासाठी आले होते, तिथे ग्राहकांची मोठी गर्दी असल्याने त्यांनी आपला बेत बदलला. विजापूर-सोलापूर राष्ट्रीय महामार्ग ५२ वरून गावात प्रवेश केलेल्या या आरोपींनी प्रथम ग्रामपंचायतीजवळील इतर सराफी दुकानांची रेकी केली होती. दरोडेखोरांनी प्रथम ‘प्रिया ज्वेलर्स’ समोर संशयास्पद हालचाली केल्याचे सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद झाले आहे. मात्र, तिथे ग्राहकांची संख्या जास्त असल्याने त्यांनी यू-टर्न घेतला आणि ‘भुवनेश्वरी ज्वेलर्स’कडे मोर्चा वळवला.
हलसंगी गावात सात सराफी दुकाने असल्याची माहिती दरोडेखोरांनी आधीच मिळवली होती. मास्टर प्लॅननुसार त्यांनी सुरुवातीला एका विशिष्ट दुकानाला लक्ष्य केले होते, पण परिस्थिती पाहून त्यांनी आपला मोर्चा महारीद्र कंचगार यांच्या भुवनेश्वरी ज्वेलर्सकडे वळवला. तिथे ग्राहक कमी असल्याचे पाहून त्यांनी दुकानात प्रवेश केला आणि कंट्री पिस्तूलचा धाक दाखवून सोन्या-चांदीचे दागिने लंपास केले. एसपी लक्ष्मण निंबरगी यांनी आरोपींच्या अटकेसाठी विशेष पथके तैनात केली आहेत.
भरदिवसा झालेल्या या धाडसी दरोड्यामुळे स्थानिक व्यापाऱ्यांमध्ये आणि नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण पसरले आहे. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींचा शोध घेतला जात आहे. पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


Recent Comments