BENGALURU

केंद्राकडून ग्रामस्वराज्य संकल्पनेला हरताळ; मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांची टीका

Share

महात्मा गांधींचे ग्रामस्वराज्याचे स्वप्न माजी पंतप्रधान राजीव गांधी यांनी सत्यात उतरवले, मात्र सध्याचे केंद्र सरकार या संकल्पनेलाच तडा देत आहे, अशी टीका महिला आणि बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केली.

मंगळवारी बेंगळुरूच्या फ्रीडम पार्कवर आयोजित ‘नरेगा बचाव संग्राम’ आंदोलनांतर्गत राजभवन चलो कार्यक्रमात त्या बोलत होत्या. काँग्रेस सरकारने ग्रामपंचायतींना बळ दिले होते, परंतु आज केंद्र सरकार ते अधिकार हिरावून घेत आहे. भारत हा खेड्यांचा देश आहे आणि खेड्यांचा विकास झाला तरच देशाचा विकास होईल, असे महात्मा गांधी म्हणायचे. नरेगा योजनेमुळे ग्रामपंचायतींची आर्थिक स्थिती सुधारली असून त्यामुळेच आज पंचायत निवडणुकांसाठी मोठी चुरस पाहायला मिळते, असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी नमूद केले.

केंद्र सरकार नरेगा योजना रद्द करून ‘व्हीबीजी रामजी’ कायदा लागू करण्याचा प्रयत्न करत आहे. या सरकारला शेतकरी, महिला आणि कामगारांची चिंता नसून ते केवळ भांडवलदारांच्या पाठीशी उभे आहे. कोणत्याही चर्चेविना केवळ आठ तासांत हा कायदा मंजूर करण्यात आला, असा आरोपही लक्ष्मी हेब्बाळकर यांनी केला.

प्रजासत्ताक दिनाच्या कार्यक्रमात एआयसीसी अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राहुल गांधी यांना तिसऱ्या रांगेत बसवून केंद्राने त्यांचा अपमान केला आहे. आमच्या काळात विरोधी पक्षाचा सन्मान राखला जात असे, मात्र भाजप सरकार विरोधकांना तुच्छ लेखत आहे, असे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी म्हटले.

या आंदोलनादरम्यान एआयसीसी सरचिटणीस रणदीप सुरजेवाला यांच्या हिंदी भाषणाचे लक्ष्मी हेब्बाळकर यांनी अस्खलित कानडीत अनुवाद करून सर्वांचे लक्ष वेधून घेतले. याप्रसंगी मुख्यमंत्री सिद्धरामय्या, उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांच्यासह मंत्रिमंडळातील अनेक सदस्य आणि आमदार उपस्थित होते.

Tags: