Belagavi

रायगडावर शिवरायांना अभिवादन करून ‘मराठी सन्मान यात्रे’चा रणशिंग

Share

महाऱाष्ट्र एकीकरण युवा समितीच्या वतीने सीमाभागात मराठी अस्मिता आणि सीमाप्रश्नाची धग कायम ठेवण्यासाठी आयोजित ‘मराठी सन्मान यात्रे’चा प्रारंभ किल्ले रायगडावरून करण्यात आला.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या समाधीचे दर्शन घेऊन आणि तिथली पवित्र माती कपाळाला लावून शेकडो कार्यकर्त्यांनी सीमा लढ्याचा निर्धार व्यक्त केला. रायगडावरील होळीच्या माळापासून अभंगांच्या गजरात ही मिरवणूक काढण्यात आली, ज्यात सीमा लढ्यातील चार पिढ्यांचे प्रतिनिधी सहभागी झाले होते. शिवरायांच्या समाधीसमोर नतमस्तक होऊन कार्यकर्त्यांनी सीमाभागातील अन्यायाविरुद्ध एकजुटीची शपथ घेतली.

यावेळी बोलताना युवा समितीचे अध्यक्ष शुभम शेळके म्हणाले की, १९५६ पासून सीमावासियांवर अन्याय होत असून कर्नाटक सरकार सातत्याने मराठी भाषिकांवर सक्ती करत आहे. आम्ही कोणत्याही भाषेचा द्वेष करत नाही, मात्र स्वतःची संस्कृती टिकवण्यासाठी आमचा संघर्ष सुरूच राहील. ‘लढा, अन्यथा गुलामगिरीची सवय होईल’ हा संदेश घेऊन आम्ही ही यात्रा काढत असल्याचे शुभम शेळके यांनी स्पष्ट केले.

या यात्रेसाठी बेळगावातून मोठ्या संख्येने कार्यकर्ते रायगडावर दाखल झाले होते. प्रवासापूर्वी कार्यकर्त्यांनी मध्यवर्ती मये समितीचे अध्यक्ष दीपक दळवी यांची भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले होते. रायगडावर कार्यकर्त्यांनी दिलेल्या संयुक्त महाराष्ट्राच्या घोषणांनी संपूर्ण परिसर दुमदुमून गेला होता. याप्रसंगी धनंजय पाटील, दिनेश मुधाळे, मनोहर हुंदरे, शिवाजी मंडोळकर, नारायण मुचंडीकर यांच्यासह शेकडो पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: