बेळगाव येथील केएलई व्ही. के. दंत विज्ञान संस्थेने नुकतेच ४ थे राष्ट्रीय आणि १७ वे प्रादेशिक स्लाईड सेमिनार आयोजित करून दंत वैद्यकीय शिक्षण क्षेत्रात यशाचा नवा टप्पा गाठला असून यात रोगनिदानातील अचूकतेवर सखोल चर्चा करण्यात आली.

केएलई व्ही. के. दंत विज्ञान संस्थेच्या मौखिक रोगशास्त्र आणि सूक्ष्मजीवशास्त्र विभागाच्या वतीने आयोजित या एकदिवसीय शैक्षणिक कार्यक्रमाचा मुख्य उद्देश मौखिक जखमांचे अचूक विश्लेषण आणि निदानावर प्रकाश टाकणे हा होता. मेरठ येथील सुभारती दंत महाविद्यालयाचे तज्ज्ञ डॉ. विजय वाधवान यांनी माउंट एव्हरेस्ट टू मरियाना ट्रेंच या विषयावर विशेष व्याख्यान देऊन गुंतागुंतीच्या मौखिक आजारांच्या तपासणीबाबत विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले.
भारताच्या शाश्वत विकास ध्येयांतर्गत दर्जेदार शिक्षणावर भर देण्याच्या उद्देशाने या सेमिनारचे आयोजन करण्यात आले होते. प्राचार्य डॉ. अलका काळे यांच्या नेतृत्वाखाली पार पडलेल्या या कार्यक्रमात आयोजन अध्यक्षा डॉ. दीपा माने आणि सचिव डॉ. चेतन बेळ्ळदवर यांनी मार्गदर्शन केले. विविध राज्यांतून आलेल्या ५० हून अधिक पदव्युत्तर विद्यार्थी आणि प्राध्यापकांनी या संवादात्मक अध्ययन व्यासपीठाचा लाभ घेतला.


Recent Comments