बेळगाव येथील गोमटेश विद्यापीठाचे नूतन उत्तराधिकारी म्हणून वृषभ संजय पाटील यांनी शुक्रवारी संध्याकाळी शास्त्राेक्त विधींनुसार पदभार स्वीकारला.


गोमटेश विद्यापीठाच्या आवारात कोल्हापूर क्षेत्राचे स्वस्तीश्री लक्ष्मीसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी आणि श्रीक्षेत्र नांदणी मठाचे स्वस्तीश्री जीनसेन भट्टारक पट्टाचार्य महास्वामीजी यांच्या दिव्य सानिध्यात हा पदग्रहण सोहळा पार पडला.

यावेळी व्यासपीठावर महापौर मंगेश पवार, उपमहापौर वाणी जोशी, राज्यसभा सदस्य इरण्णा कडाडी, माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले, खानापूरचे आमदार विठ्ठल हलगेकर, माजी खासदार रमेश कत्ती, माजी मंत्री वीरकुमार पाटील, मोहन शहा, कल्लाप्पण्णा मगन्नवर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

पदग्रहणानंतर बोलताना नूतन उत्तराधिकारी वृषभ पाटील म्हणाले की, “गोमटेश विद्यापीठाचे संस्थापक भद्रबाहू महाराज यांनी शिक्षणासोबत संस्कार देण्याचा संकल्प केला होता. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवून आणि ज्येष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या संस्थेला यशाच्या शिखरावर नेण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील राहीन.”
माजी आमदार संजय पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “राजकीय संघर्षातून नव्हे, तर सर्वांच्या सहकार्यातून ही संस्था उभी राहिली आहे. वृषभला माझा हाच सल्ला आहे की, ही संस्था तुमची किंवा आमची वडिलोपार्जित मालमत्ता नाही, ती भद्रबाहू स्वामींची आहे. तुम्ही याचे मालक न बनता रक्षक व्हा. गोमटेश विद्यापीठाला आपले कुटुंब मानून कार्य करा. मी अजून थकलो नाही किंवा निवृत्तही झालेलो नाही,” असेही त्यांनी आपल्या खास शैलीत नमूद केले.

केएलई संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. प्रभाकर कोरे यांनीही संजय पाटील यांच्या कार्याचे कौतुक केले. “राजकारणासोबत शिक्षण संस्था चालवणे सोपे नसते. संजय पाटील यांनी ३० वर्षांपासून गोमटेश संस्था जपली आणि वाढवली आहे. आज वृषभकडे ही जबाबदारी सोपवली जात आहे, ही आनंदाची बाब आहे,” असे ते म्हणाले.

दक्षिणचे आमदार अभय पाटील यांनी वृषभ पाटील यांना शुभेच्छा देताना म्हटले की, “संजय पाटील यांनी २९ वर्षांच्या कठीण प्रवासात या संस्थेला एका चांगल्या वळणावर आणले आहे. आता वृषभ यांचा सुवर्णकाळ सुरू झाला असून, येणाऱ्या १० वर्षांत त्यांनी इतके मोठे कार्य करावे की, लोकांनी ‘वृषभ पाटील यांचे वडील संजय पाटील’ म्हणून त्यांची ओळख सांगावी.”
या कार्यक्रमाला गोमटेश विद्यापीठाचे पदाधिकारी, कर्मचारी आणि मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


Recent Comments