Khanapur

प्रेमविवाह केल्याने दोन कुटुंबांवर सामाजिक बहिष्कार; खानापुरात खळबळ

Share

खानापूर तालुक्यातील निडलगी गावात प्रेमविवाह केल्याच्या कारणावरून मराठा समाजातील दोन कुटुंबांवर ग्रामपंचायतीच्या पंचांनी सामाजिक बहिष्कार टाकल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या अन्यायकारक निर्णयाविरोधात पीडित कुटुंबांनी आता दलित संघर्ष समितीच्या माध्यमातून तहसीलदारांकडे दाद मागितली आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, निडगल गावातील कीर्ती आणि भूतनाथ कदम या दांपत्याने २०२२ मध्ये प्रेमविवाह केला होता. या विवाहाला विरोध करत गावातील पंचांनी त्यांच्या कुटुंबावर वाळीत टाकण्याचा निर्णय घेतला. या कुटुंबांना गावातील मंदिर प्रवेश, सार्वजनिक सभा-समारंभ, अंगणवाडी आणि अगदी स्मशानभूमीतही प्रवेश बंदी करण्यात आली आहे.

गावातील कोणत्याही व्यक्तीने या कुटुंबाशी संवाद साधल्यास, व्यवहार केल्यास किंवा त्यांना मजुरीसाठी कामावर बोलावल्यास ११ हजार रुपये दंड आकारण्याचा फतवा पंच कमिटीने काढला आहे. इतकेच नव्हे तर चार महिन्यांपूर्वी भूतनाथ यांच्या वडिलांचे निधन झाले असता, त्यांना स्मशानभूमीत अंत्यविधी करण्यास मज्जाव करण्यात आला. अखेर ३१ हजार रुपयांचा दंड वसूल केल्यानंतरच अंत्यसंस्काराची परवानगी देण्यात आली, अशी व्यथा पीडितांनी मांडली आहे.

न्यायासाठी या कुटुंबांनी जिल्हाधिकारी, जिल्हा पोलीस प्रमुख आणि खानापूर सीपीआय यांच्याकडे पोस्टाद्वारे तक्रारी केल्या होत्या. मात्र, अद्याप कोणताही ठोस न्याय न मिळाल्याने त्यांनी कर्नाटक राज्य दलित संघर्ष समितीचे दार ठोठावले आहे.

या प्रकरणी दलित संघर्ष समितीने खानापूर तहसीलदारांना निवेदन देऊन या कुटुंबांना न्याय देण्याची मागणी केली आहे. यावेळी संघटनेचे बेळगाव जिल्हा सरचिटणीस राजशेखर हिंडलगी, तालुकाध्यक्ष राघवेंद्र चलवादी, उपाध्यक्ष मारुती कांबळे, दयानंद आदिवासी, रवी मादार, बसवराज मादार आणि पीडित कुटुंब उपस्थित होते.

Tags: