खानापूर शहरात गांजा विक्री आणि सेवन करणाऱ्यांविरुद्ध पोलिसांनी कडक पावले उचलली आहेत. रेल्वे स्थानक परिसरात सुरू असलेल्या या अवैध धंद्यावर छापा टाकून पोलिसांनी गांजासह एकाला अटक केली असून, अमली पदार्थांचे सेवन करणाऱ्या अन्य दोघांना ताब्यात घेतले आहे.
मिळालेल्या गुप्त माहितीनुसार, खानापूर रेल्वे स्थानकाकडे जाणाऱ्या सार्वजनिक रस्त्यावर फ्रान्सिस पास्तू सोझा (वय ६६, रा. मनहापूर) हा व्यक्ती बेकायदेशीररीत्या गांजा विक्री करत होता. पोलिसांनी या ठिकाणी सापळा रचून फ्रान्सिस याला रंगेहाथ पकडले. त्याच्याकडून ३ हजार रुपये किमतीचा सुमारे १३५ ग्रॅम सुका गांजा जप्त करण्यात आला आहे.
या प्रकरणी फ्रान्सिस सोझा विरुद्ध खानापूर पोलीस ठाण्यात अमली पदार्थ विरोधी कायदा कलम २० (बी) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तपास दरम्यान फ्रान्सिस सोझा याने दिलेल्या माहितीनुसार, जप्त केलेला गांजा त्याचा मुलगा येसुनंद सोझा याने विक्रीसाठी आणला होता. येसुनंदने अनेकांना गांजा विकल्याची कबुलीही फ्रान्सिसने दिली आहे.
या माहितीच्या आधारे पोलिसांनी गांजा सेवन केल्याच्या आरोपावरून रेहमान कुतबुद्दीन इटगी (वय २९, रा. शिवाजीनगर) आणि रोहित दत्ताराम रगडे (वय २१, रा. केंचापूर गल्ली) या दोघांना ताब्यात घेऊन कायदेशीर कारवाई केली आहे.
दरम्यान, गांजा पुरवठा करणारा मुख्य संशयित येसुनंद सोझा आणि गांजा खरेदी करणाऱ्या इतर आरोपींचा पोलीस शोध घेत आहेत. लवकरच त्यांना अटक करून कठोर कारवाई केली जाईल, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे.


Recent Comments