Belagavi

दैवज्ञ ज्वेलर्स असोसिएशनच्या अध्यक्षपदी गजानन अणवेकर

Share

बेळगाव येथील शहापूर भागातील दैवज्ञ मंगल कार्यालयात ‘दैवज्ञ ज्वेलर्स असोसिएशन’ची ९ वी वार्षिक महासभा उत्साहात पार पडली. या सभेमध्ये २०२६ ते २०२९ या तीन वर्षांच्या कालावधीसाठी नूतन पदाधिकाऱ्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या महासभेला १५० हून अधिक आजीव सदस्य उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला सचिव सौरभ रेवणकर यांनी वार्षिक अहवाल मांडला, तर खजिनदार प्रशांत रेवणकर यांनी जमा-खर्चाचा हिशोब आणि ताळेबंद सादर केला. मावळते अध्यक्ष वैभव वेर्णेकर यांनी आपल्या कार्यकाळातील संघटनेच्या यशोगाथेबद्दल माहिती दिली.

दयानंद नेतलकर यांच्या नेतृत्वाखाली नवीन नियामक मंडळाची निवड प्रक्रिया पार पडली. यामध्ये एकूण २५ सदस्यांचे नवीन मंडळ एकमताने स्थापन करण्यात आले. यामध्ये गजानन एन. अणवेकर यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली.

या नूतन कार्यकारिणीत वैभव एस. वेर्णेकर यांची मानद सचिव म्हणून, तर प्रशांत डी. रेवणकर यांची खजिनदार म्हणून नियुक्ती झाली. याशिवाय उपाध्यक्षपदी जीवन डी. वेर्णेकर, नागराज एल. वेर्णेकर यांची सहसचिव म्हणून आणि संजय आर. अणवेकर यांची सहखजिनदार म्हणून निवड करण्यात आली.

यावेळी ज्येष्ठ सल्लागार समितीचे सदस्य दीनानाथ पी. रेवणकर, प्रवीण आर. रेवणकर, एकनाथ आर. पौसकर आणि महाबळेश्वर शेजेकन उपस्थित होते. संघटनेच्या भविष्यातील वाटचालीसाठी या सर्व ज्येष्ठांनी नूतन पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केले.

Tags: