बेळगाव येथील कॅम्प भागातील सेंट जोसेफ कॅनॉसियन कॉन्व्हेंट हायस्कूलमध्ये दहावीच्या विद्यार्थ्यांचा टॉर्च सेरेमनी आणि पासिंग आऊट परेड सोहळा आमदार आसिफ सेठ यांच्या उपस्थितीत पार पडला.


या कार्यक्रमादरम्यान आमदार आसिफ सेठ यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधत आत्मविश्वास, शिस्त आणि जिद्दीच्या जोरावर आपली स्वप्ने पूर्ण करण्याचे आवाहन केले. शाळेने विद्यार्थ्यांना शैक्षणिक पायासोबतच दिलेल्या संस्कारांचे आणि शिक्षक वृंदाच्या समर्पणाचे आसिफ सेठ यांनी कौतुक केले.
शिक्षणावर आपला विशेष भर असल्याचे सांगतानाच, बोर्ड परीक्षेची तयारी करणाऱ्या दहावीच्या विद्यार्थ्यांचे मनोबल वाढवण्यासाठी आपण कटिबद्ध असल्याचे आमदार आसिफ सेठ यांनी स्पष्ट केले. या निर्णायक टप्प्यावर सातत्यपूर्ण मार्गदर्शन, स्वतःवर विश्वास आणि मानसिक आरोग्य जपणे अत्यंत आवश्यक आहे, असे प्रतिपादन आसिफ सेठ यांनी केले.

शाळेतून बाहेर पडणाऱ्या विद्यार्थ्यांकडे जबाबदारी आणि मूल्यांचे हस्तांतरण या सोहळ्यातून करण्यात आले. यावेळी शांतता, आशा आणि नेतृत्वाचे प्रतीक म्हणून हा सोहळा पार पडला. शैक्षणिक आणि इतर उपक्रमांमध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा यावेळी विशेष सन्मान करण्यात आला. या प्रसंगी शाळा व्यवस्थापन समिती, शिक्षक, पालक आणि हितचिंतक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments