सौंदत्ती येथील श्री रेणुका यल्लम्मा देवीच्या दर्शनासाठी आलेल्या एका कार चालकाला पोलिसांनी बेदम मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून या घटनेचा व्हिडिओ समाजमाध्यमांवर व्हायरल झाला आहे.

रायबाग तालुक्यातील बॅकूड गावातील एक चालक देवीच्या दर्शनासाठी सौंदत्तीला आला होता. जोगुळभावीजवळ इतर वाहने उभी असलेली पाहून त्यानेही आपली कार नो पार्किंगमध्ये लावली. यावेळी आलेल्या पोलिसांनी लाठीने कारवर प्रहार करण्यास सुरुवात केली. गाडीवर मारू नका, अशी विनंती चालकाने केली असता पोलिसांनी त्याला अवाच्च भाषेत शिवीगाळ करण्यास सुरुवात केली.

पोलिसांच्या शिवीगाळीला विरोध केल्याने संतापलेल्या सीपीआय, पीएसआय आणि कॉन्स्टेबलसह इतर कर्मचाऱ्यांनी चालकाला खाली पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्याचा आरोप चालकाने केला आहे. मी हात जोडून विनंती करत होतो, तरीही त्यांनी मला जमिनीवर लोळवून मारले आणि कारच्या चावीने माझ्या पोटावर वार केले, अशी आपबिती पीडित चालकाने मांडली आहे.
भररस्त्यात चालकावर पोलिसांचा अट्टाहास सुरू असताना नागरिक मूकप्रेक्षक बनून पाहत होते. या घटनेचा व्हिडिओ समोर आल्यानंतर सार्वजनिक स्तरावर पोलिसांच्या या अमानुष कृत्याबद्दल तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. संबंधित पोलीस अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई करून आपल्याला न्याय व नुकसान भरपाई मिळावी, अशी मागणी पीडित चालकाने केली आहे. ही घटना सौंदत्ती पोलीस ठाण्याच्या हद्दीत घडली आहे.


Recent Comments