खानापूर तालुक्यातील अळनावर-रामनगर राज्य महामार्गावर कारचा टायर फुटून झालेल्या भीषण अपघातात बेंगळुरूमधील ९ वर्षीय बालकाचा मृत्यू झाला आहे. चालकाचा अतिवेग आणि निष्काळजीपणामुळे हा अनर्थ घडला असून कारमधील इतर चार जण जखमी झाले आहेत.

धारवाड-अळनावर-रामनगर या राज्य महामार्गावरून भरधाव वेगात येणाऱ्या कारने अळनावरकडून रामनगरकडे जात असताना अचानक कारचा उजव्या बाजूचा टायर फुटला. वाहनाचा वेग प्रचंड असल्याने चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले आणि ही भरधाव कार थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या झाडावर जाऊन आदळली.
या भीषण धडकेत कारमध्ये बसलेला गुणव नामक मुलगा आणि त्याची मैत्रीण सव्या हि १० वर्षीय दोन्ही बालके गंभीर जखमी झालीआहेत. याच कारमधील अक्षय यांचा ९ वर्षांचा मुलगा हियांश याच्या डोक्याला आणि पायाला गंभीर इजा झाली होती. त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.
मृत हियांश अक्षय हा बेंगळुरू येथील कोरमंगला येथील रहिवासी असून, या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघाताप्रकरणी नंदगड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलीस अधिक तपास करत आहेत.


Recent Comments