सुळेभावी गावात शेतकऱ्यांच्या हितासाठी शेतरस्ता निर्माण करण्यास प्रशासन जाणीवपूर्वक विलंब करत असल्याचा आरोप करत आज युवा कर्नाटक रक्षण वेदिकेच्या वतीने जोरदार निदर्शने करण्यात आली. यावेळी जिल्हा प्रशासनाच्या दिरंगाईच्या धोरणाविरुद्ध घोषणाबाजी करून संताप व्यक्त करण्यात आला.

बेळगावमधील राणी चन्नम्मा चौकात झालेल्या या आंदोलनात कार्यकर्त्यांनी सुळेभावीतील समस्या मांडल्या. गावातील ३०० हून अधिक शेतकरी कुटुंबांना शेतात जाण्यासाठी रस्ता नसल्याने सांडपाण्यातून प्रवास करावा लागत असून त्यामुळे आरोग्याचे गंभीर प्रश्न निर्माण झाले आहेत. जिल्हाधिकाऱ्यांना वारंवार निवेदन देऊनही याकडे दुर्लक्ष केले जात असल्याचे आंदोलकांनी सांगितले.
पावसाळ्याचे कारण देऊन ६ महिने काम लांबणीवर टाकण्यात आले होते, मात्र आता हिवाळा संपत आला तरी प्रशासन हालचाल करत नाही, असे संघटनेचे अध्यक्ष सुनील एन. यांनी म्हटले आहे. प्रशासनाने तत्काळ रस्ता न बांधल्यास प्रत्यक्ष घटनास्थळीच स्वयंपाक करून तीव्र धरणे आंदोलन करण्याचा इशारा सुनील एन. यांनी दिला.
यावेळी युवा कर्नाटक रक्षण वेदिकेचे पदाधिकारी आणि शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments