कित्तूर तालुक्यातील एम. के. हुबळी येथील मलप्रभा सहकारी साखर कारखान्यातील भ्रष्टाचार आणि गैरव्यवहाराबाबतचा न्यायालयीन चौकशी अहवाल तातडीने सार्वजनिक करावा, अशी मागणी भारतीय कृषक समाजाचे प्रदेशाध्यक्ष सिद्धगौडा मोदगी यांनी केली आहे.

उत्तर कर्नाटकातील महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या मलप्रभा साखर कारखान्यात आर्थिक गैरव्यवहार आणि सत्तेचा गैरवापर झाल्याचा आरोप सिद्धगौडा मोदगी यांनी केला. २०१७-१८ च्या हंगामात ऊस पुरवठा करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रति टन ५९४ रुपयांप्रमाणे ७ कोटी ८० लाख रुपये अद्याप मिळालेले नाहीत. तसेच गोदामात १८,४१२ क्विंटल साखरेचा अवैध साठा, व्यवस्थापकीय संचालकांची बेकायदेशीर नियुक्ती आणि साखर खरेदी-विक्रीत मोठा घोटाळा झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती, अशी माहिती सिद्धगौडा मोदगी यांनी दिली.
सध्या आमदार चन्नराज हट्टीहोळी यांच्या नेतृत्वाखालील संचालक मंडळ कार्यरत असून त्यांनी दिलेली निवडणूक आश्वासने पूर्ण करावीत. मागील काळातील गैरव्यवहारांबाबत साखर मंत्री शिवानंद पाटील यांनी संयुक्त न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले होते. या प्रकरणाची चौकशी पूर्ण होऊन अहवाल सरकारला सादर करण्यात आला आहे, असे सिद्धगौडा मोदगी यांनी सांगितले.
यावेळी बोलताना, कारखान्यातील सत्य परिस्थिती समोर येण्यासाठी सरकारने हा अहवाल जाहीर करणे आवश्यक आहे, अशी भूमिका सिद्धगौडा मोदगी यांनी मांडली.
या पत्रकार परिषदेला ईरप्पा पट्टेण्णा, मल्लिकार्जुन यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments