hubali

हुबळीच्या सुतगट्टी परिसरात बिबट्याचा वावर; ग्रामस्थांमध्ये दहशतीचे वातावरण

Share

हुबळी शहर आणि उपनगरांमध्ये गेल्या काही दिवसांपासून बिबट्याचा वावर वाढल्याने नागरिकांमध्ये प्रचंड घबराट पसरली आहे. गुरुवारी रात्री हुबळीच्या बाहेरील सुतगट्टी गावातील कॉनकोर्ड ले-आउट परिसरात बिबट्या मुक्तपणे संचार करताना आढळला असून, त्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

गेल्या महिनाभरापासून हुबळीच्या आसपासच्या गामनगट्टी, तारीहाळ आणि सुतगट्टी या गावांमध्ये बिबट्याचा उपद्रव सुरू आहे. आठवड्यापूर्वी गामनगट्टी येथील एका गोठ्यात शिरून बिबट्याने गायीवर हल्ला केला होता. आता सुतगट्टी परिसरात बिबट्याचा वावर मोबाईल कॅमेऱ्यात कैद झाल्याने शेतात जाणाऱ्या शेतकऱ्यांच्या आणि रहिवाशांच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

सातत्याने होणाऱ्या बिबट्याच्या दर्शनामुळे जनावरांच्या जीवालाही धोका निर्माण झाला आहे. वन विभागाने या परिसरात तातडीने पिंजरा लावून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी स्थानिक रहिवाशांकडून केली जात आहे.

Tags: