देशातील प्रतिष्ठित केएलई शैक्षणिक संस्थेच्या संचालक मंडळाची निवडणूक प्रक्रिया बिनविरोध पार पडली आहे. गेल्या चार दशकांपासून संस्थेला जागतिक स्तरावर नावलौकिक मिळवून देणारे डॉ. प्रभाकर कोरे यांनी यंदा सक्रिय निवडणुकीतून दूर राहण्याचा निर्णय घेतल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.

केएलई संस्थेच्या या निवडणुकीत यंदा मोठे फेरबदल पाहायला मिळाले. डॉ. प्रभाकर कोरे यांचे पुत्र अमित कोरे आणि कन्या प्रीती दोडवाड यांची संचालक मंडळावर बिनविरोध निवड झाली आहे. गेल्या ४० वर्षांपासून ग्रामीण भागापासून दिल्लीपर्यंत संस्थेचे साम्राज्य विस्तारणाऱ्या डॉ. प्रभाकर कोरे यांनी स्वतः मात्र निवडणूक न लढवता थांबणे पसंत केले आहे. त्यांच्या या निर्णयामुळे संस्थेचा पुढील वारसदार कोण असेल, यावर आता चर्चा रंगू लागली आहे.
संचालक मंडळाच्या सदस्यांनी डॉ. प्रभाकर कोरे यांना निवडणूक लढवण्याची विनंती केली होती, मात्र त्यांनी ही विनंती नाकारली. आपण प्रत्यक्ष निवडणुकीत न उतरता केवळ मार्गदर्शक म्हणून संस्थेच्या पाठीशी उभे राहणार असल्याचे डॉ. कोरे यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे संस्थेचे नेतृत्व आता नव्या पिढीकडे सोपवले जाणार की एखाद्या अनुभवी ज्येष्ठ सदस्याची निवड होणार, याचे उत्तर ९ फेब्रुवारीच्या बैठकीत मिळणार आहे.
संस्थेच्या भविष्यातील वाटचालीच्या दृष्टीने ९ फेब्रुवारीला होणारी ही बैठक अत्यंत निर्णायक ठरेल, असे डॉ. प्रभाकर कोरे यांनी म्हटले आहे.


Recent Comments