बेंगळुरू येथील विधानसभा अधिवेशनात राज्यपालांसोबत केलेले गैरवर्तन हा लोकशाहीचा काळा दिवस आहे, अशी टीका राज्यसभा खासदार ईरण्णा कडाडी यांनी केली आहे. अधिवेशनाच्या वेळी मुख्यमंत्र्यांनी राज्यपालांचे स्वागत करून निरोप देणे अपेक्षित असताना काँग्रेसचे मंत्री आणि आमदारांनी त्यांना अडवून हुल्लडबाजी केली, असा आरोप त्यांनी केला.

मनरेगा योजनेच्या नामकरणावरून काँग्रेस करत असलेला विरोध बिनबुडाचा असल्याचे कडाडी यांनी बेळगाव येथील पत्रकार परिषदेत सांगितले. १९८० पासून विविध नावांनी सुरू असलेल्या या योजनेचा वापर काँग्रेसने केवळ व्होट बँक मजबूत करण्यासाठी केला. केंद्र सरकार बेरोजगारांना रोजगार देण्याचे काम करत आहे, मात्र काँग्रेससाठी ही योजना केवळ भ्रष्टाचार करून पैसे कमावण्याचे साधन बनली आहे, असे ईरण्णा कडाडी यांनी म्हटले आहे.
बेळगाव जिल्हा विभाजनाबाबत बोलताना कडाडी यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. १८ विधानसभा मतदारसंघ आणि ५० लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या बेळगाव जिल्ह्याचे पाच जिल्ह्यांत विभाजन झाले तरी त्यात काही गैर नाही. मात्र, सरकारने या संदर्भातील आयोगाच्या अहवालाकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले आहे, अशी नाराजी ईरण्णा कडाडी यांनी व्यक्त केली.
अधिवेशनात राज्यपालांचा अपमान करून काँग्रेसने लोकशाही मूल्यांची पायमल्ली केली आहे, असे ईरण्णा कडाडी यांनी म्हटले आहे.
या पत्रकार परिषदेला भाजप शहराध्यक्ष गीता सुतार, महानगरपालिका सभागृह नेते हनुमंत कोंगाळी आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.


Recent Comments