Bagalkot

मुधोळमध्ये शेतकरी विरुद्ध साखर कारखाना संघर्ष पेटला; १७ शेतकऱ्यांना कोर्टाची नोटीस

Share

बागलकोट जिल्ह्यातील मुधोळ येथे शेतकरी आणि साखर कारखाना मालकांमधील वाद टोकाला गेला आहे. आंदोलनावर अंकुश ठेवण्यासाठी कारखाना व्यवस्थापनाने न्यायालयात धाव घेतल्याने आता शेतकऱ्यांचा संताप अधिकच अनावर झाला आहे.

जमखंडीचे आमदार जगदीश गुडगुंटी यांच्या मालकीच्या सिद्धापूर येथील प्रभुलींगेश्वर साखर कारखान्याभोवती आंदोलन करण्यास न्यायालयाने मनाई केली आहे. कारखान्याच्या ५०० मीटर परिसरात निदर्शने करू नयेत, अशी नोटीस १७ शेतकरी नेत्यांना बजावण्यात आली आहे. कारखाना प्रशासनाने न्यायालयात दाखल केलेल्या अर्जावरून ही कारवाई करण्यात आली असून, यामुळे मुधोळ परिसरातील शेतकरी चांगलेच संतापले आहेत.

न्यायालयाच्या या नोटिसीनंतर शेतकऱ्यांनी मुधोळ येथे तातडीची बैठक घेऊन तीव्र आंदोलनाचा पवित्रा घेतला आहे. आज शिरोळ क्रॉस येथे रस्ता रोको करून साखर कारखान्याकडे जाणारी ऊस वाहतूक रोखण्याचा निर्णय शेतकऱ्यांनी घेतला आहे. या पार्श्वभूमीवर मुधोळ आणि जमखंडी परिसरात सध्या मोठ्या प्रमाणावर तणाव निर्माण झाला आहे.

Tags: