धारवाड उपनगर पोलिसांनी दुचाकी चोरी करणाऱ्या एका टोळीचा पर्दाफाश करून दोन सराईत चोरट्यांना अटक केली आहे. आरोपींकडून वेगवेगळ्या ठिकाणांहून चोरलेल्या ३ लाख ६५ हजार रुपये किमतीच्या ९ दुचाकी जप्त करण्यात आल्या आहेत.

हुबळीतील हुवप्पा ऊर्फ कुमार आसंगी आणि पुंडलिक नागण्णवर अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. या आरोपींनी धारवाड उपनगर, हुबळी शहर आणि हावेरी शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून दुचाकी चोरल्याची कबुली दिली आहे. शहरातील वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलीस आयुक्त एन. शशीकुमार यांनी विशेष पथक तयार केले होते.
या विशेष पथकाने तांत्रिक तपासाच्या आधारे दोन्ही चोरट्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ९ दुचाकी जप्त केल्या आहेत. या कारवाईमुळे दुचाकी चोरीच्या अनेक गुन्ह्यांची उकल झाली असून पोलीस पुढील तपास करत आहेत.


Recent Comments