बैलहोंगल तालुक्यातील नेगिनहाळ गावात कौटुंबिक वादातून पतीने आपल्या पत्नीची गळा आवळून हत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
बैलहोंगल पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या नेगिनहाळ गावात २१ जानेवारी रोजी मध्यरात्री ही घटना घडली. राजेश्वरी (वय २१) असे मृत महिलेचे नाव असून पती फक्किरप्पा बसप्पा गिलक्कनवर (वय २८) याने तिची हत्या केली आहे. या दाम्पत्याच्या विवाहाला तीन वर्षे झाली होती, मात्र त्यांना मुलं नव्हती. याच कारणावरून राजेश्वरी दररोज पतीशी भांडण करत असल्याने फक्किरप्पा मानसिक तणावाखाली होता, असे सांगण्यात येत आहे.
घटनेच्या दिवशी राजेश्वरीने आपल्या जखमी भावाला पाहण्यासाठी माहेरी जाण्याचा हट्ट धरला होता. परंतु शेतात कामाचा व्याप अधिक असल्याचे सांगून फक्किरप्पाने तिला जाण्यास मज्जाव केला. यावरून दोघांमध्ये तीव्र शाब्दिक चकमक उडाली. या रागातून फक्किरप्पाने राजेश्वरी झोपेत असताना दोरीने तिचा गळा आवळून तिची हत्या केली. याप्रकरणी बैलहोंगल पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १०३(१) अन्वये गुन्हा दाखल केला असून वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळाची पाहणी केली आहे.
पीडितेच्या आईने आपली व्यथा मांडतांना सांगितले कि, पूर्वी जेव्हा भांडण झाले होते, तेव्हा आम्ही त्यांना समजावून सांगितले होते आणि तिला सासरी सोडून आलो होतो. काही दिवस सर्व काही सुरळीत चालायचे, पण त्यानंतर पुन्हा छळ सुरू व्हायचा. यावेळी मात्र त्यांनी थेट हे कृत्य केले, अशा शब्दांत पीडितेच्या आईने आपला टाहो फोडला.
तिला हृदयविकाराचा झटका आला आहे असे सांगून त्यांनी आम्हाला घरी बोलावून घेतले. मात्र, तिथे जाऊन पाहिले असता तिची मान सुजलेली होती आणि गळ्यावर दोरीच्या खुणा स्पष्ट दिसत होत्या. लग्नाला २-३ वर्षे झाली आहेत, जर मुले होत नव्हती तर सुरुवातीलाच दवाखान्यात न्यायला हवे होते, अशी प्रतिक्रिया मृत महिलेच्या नातेवाईकांनी व्यक्त केली.


Recent Comments