Belagavi

इस्लामिया शिक्षण संस्थेतर्फे विज्ञान प्रदर्शन आणि अन्नोत्सवाचे आयोजन

Share

बेळगाव कॅम्प येथील इस्लामिया शिक्षण संस्थेच्या वतीने आयोजित विज्ञान प्रदर्शन आणि अन्नोत्सवाचे उद्घाटन उत्तरचे आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या विविध विज्ञान प्रतिकृतींनी उपस्थितांचे लक्ष वेधून घेतले.

इस्लामिया शिक्षण संस्थेने आयोजित केलेल्या या कार्यक्रमाला आमदार आसिफ सेठ यांनी प्रमुख पाहुणे म्हणून हजेरी लावली. यावेळी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनी आमदारांचे स्वागत करून शाळेच्या विविध प्रलंबित मागण्यांचे निवेदन त्यांना सादर केले. या मागण्यांची दखल घेऊन त्या पूर्ण करण्यासाठी सकारात्मक प्रयत्न करण्याचे आश्वासन आमदारांनी यावेळी दिले.

कॅम्प मुस्लिम शिक्षण संस्थेचे अध्यक्ष अब्दुल रशीद मुजावर यांनी या कार्यक्रमाचे अध्यक्षपद भूषवले. आमदारांच्या हस्ते क्रिकेट स्पर्धेचाही शुभारंभ करण्यात आला. त्यानंतर त्यांनी अन्नोत्सवाचे उद्घाटन करून विद्यार्थ्यांनी तयार केलेल्या खाद्यपदार्थांचा आस्वाद घेतला.

विज्ञानाच्या विविध प्रतिकृतींचे उद्घाटन केल्यानंतर आमदारांनी विद्यार्थ्यांच्या सृजनशीलतेचे भरभरून कौतुक केले. मुलांमधील उत्साह आणि त्यांच्या कौशल्याला व्यासपीठ मिळवून देण्यासाठी असे उपक्रम अत्यंत पूरक ठरतात, असे प्रतिपादन आमदार आसिफ सेठ यांनी यावेळी केले.

रेहान मुजावर यांनी या संपूर्ण कार्यक्रमाचे नियोजन आणि उद्दिष्टांबाबत सविस्तर माहिती दिली. या प्रसंगी मोहम्मद इक्बाल किल्लेदार, सोहेल किल्लेदार, अती मुजावर, जावेद इनामदार, हाजी भावनगरी, डॉ. अन्वर मुजावर, आय. एम. पाळेगार, बी. सी. सवणूर यांच्यासह इतर मान्यवर आणि कर्मचारी उपस्थित होते.

Tags: