धारवाडमध्ये काल घडलेल्या खुनाचा उलगडा झाला आहे. ज्याच्यासोबत आयुष्य जगण्याचे स्वप्न पाहिले होते, त्याच भावी पतीने एका तरुणीचा गळा घोटून तिचा मृतदेह फेकून दिला. धक्कादायक म्हणजे, हत्येनंतर आरोपी स्वतः खुनाचा बनाव रचत होता. मात्र धारवाड ग्रामीण पोलिसांनी अवघ्या २४ तासांत या गुन्ह्याचा छडा लावून आरोपीला बेड्या ठोकल्या आहेत.

धारवाडच्या गांधी चौकातील २० वर्षीय झाकिया मुल्ला हिचा मृतदेह २१ जानेवारी रोजी विनय डेअरी जवळ निर्जनस्थळी आढळून आला होता. झाकियाने पॅरामेडिकलचे शिक्षण पूर्ण केले होते. मंगळवारी लॅबमध्ये जात असल्याचे सांगून ती घराबाहेर पडली होती. यावेळी तिचा कॉलेज मित्र साबीर मुल्ला तिच्यासोबत होता. झाकिया आणि साबीरचे प्रेमसंबंध होते आणि दोघांच्या लग्नाला घरच्यांनी संमतीही दिली होती. फेब्रुवारी महिन्यात त्यांचा साखरपुडा होणार होता.
मात्र, साबीरने झाकियाला फिरायला नेण्याच्या बहाण्याने नेले आणि तिची निर्घृण हत्या केली. पुरावा नष्ट करण्यासाठी त्याने तिचा मृतदेह रस्त्याशेजारी फेकून दिला. रात्री जेव्हा झाकिया घरी परतली नाही, तेव्हा साबीरनेच तिच्या कुटुंबीयांना फोन करून शोध घेण्याचे नाटक केले आणि पोलिसांत तक्रारही दिली. पोलिसांनी तांत्रिक तपासाद्वारे मोबाईल लोकेशन तपासले असता, साबीरचे बिंग फुटले. पोलिसांनी खाक्या दाखवताच त्याने हत्येची कबुली दिली.
साबीर आणि झाकियाचे लग्न आम्ही ठरवले होते. आमचा त्याच्यावर खूप विश्वास होता. माझी मुलगी त्याच्यासोबत सुरक्षित आहे असेच आम्हाला वाटायचे. पण त्यानेच माझ्या मुलीचा जीव घेतला. अशा गुन्हेगाराला फाशीचीच शिक्षा व्हायला हवी अशी मागणी मृत तरुणीचे वडील युनिश मुल्ला यांनी केली आहे.
मृत तरुणीचे नातेवाईक परवेझ यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले कि, “झाकिया बेपत्ता झाल्यापासून साबीर आमच्यासोबत तिला शोधत होता. त्याने पोलिसांनाही चुकीच्या ठिकाणी नेऊन तपास भरकटवण्याचा प्रयत्न केला. पण पोलिसांनी जेव्हा मोबाईल लोकेशन चेक केले, तेव्हा सत्य समोर आले. त्याने सर्वांचा विश्वासघात केला आहे.”
एकंदर घटनेबाबत सविस्तर माहिती देताना धारवाड चे पोलीस आयुक्त गुंजन आर्य म्हणाले, “धारवाड ग्रामीण पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका तरुणीचा मृतदेह सापडला होता. या प्रकरणाचा तपास करताना तांत्रिक पुराव्यांच्या आधारे साबीर मुल्ला याला ताब्यात घेण्यात आले. त्याने हत्येची कबुली दिली असून, काही वैयक्तिक कारणातून आणि जुन्या वादातून ही हत्या केल्याचे समोर आले आहे. २४ तासांच्या आत पोलिसांनी आरोपीला अटक केली असून पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे.”


Recent Comments