Belagavi

नंदगडमधील आदिवासी समाजाला मिळणार हक्काचे घर आणि जमीन

Share

दशकांपासून प्रलंबित असलेल्या हक्कीपिक्की आणि कातकरी समाजाच्या समस्या सुटण्याच्या मार्गावर असून या समाजाच्या तीन वर्षांच्या संघर्षाला मोठे यश आले आहे.
जिल्हाधिकाऱ्यांकडून मागणीची दखल घेत लवकरच बैठकीचे आयोजन करण्यात आले आहे.

बेळगाव जिल्ह्यातील नंदगड येथील हक्कीपिक्की आणि कातकरी समुदायाने आपल्या हक्कांसाठी पुकारलेल्या प्रदीर्घ लढ्याला आता यश येताना दिसत आहे. मुख्यमंत्र्यांना निवेदन दिल्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी या समुदायांच्या विकासासाठी सकारात्मक पाऊल उचलले असून, २८ जानेवारी रोजी खानापूर येथे सर्व संबंधित अधिकाऱ्यांची विशेष बैठक बोलावली आहे.

नुकत्याच नंदगड ग्रामपंचायतीच्या हद्दीत मुख्यमंत्र्यांना दिलेल्या निवेदनाची दखल घेत, आज जिल्हाधिकाऱ्यांची भेट घेणाऱ्या शिष्टमंडळाला सकारात्मक आश्वासन देण्यात आले. या दोन्ही समाजातील नागरिकांना हक्काची जमीन, घरे आणि मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी २८ जानेवारी २०२६ रोजी खानापूर तहसीलदार कार्यालयात विशेष बैठक आयोजित करण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले.

या महत्त्वपूर्ण निर्णयाबद्दल समाधान व्यक्त करत बेळगाव जिल्हा अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक समितीचे सदस्य तथा ज्येष्ठ दलित नेते मल्लेश चौगुले आणि केआरडीएसएसचे जिल्हा सरचिटणीस राजशेखर हिंदलगी यांनी जिल्हाधिकाऱ्यांचा सत्कार केला. २८ जानेवारी रोजी उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदारांच्या उपस्थितीत जमिनीच्या सर्वेक्षणाचे काम सुरू होणार असून, दशकांपासून प्रलंबित असलेल्या समस्यांवर कायमस्वरूपी तोडगा निघेल, अशी आशा आयोजकांनी व्यक्त केली.

यावेळी रवी मादर, राघवेंद्र चलवादी, मारुती कांबळे यांच्यासह इतर कार्यकर्ते उपस्थित होते.

Tags: