बेळगाव शहराच्या टिळकवाडी भागात स्वच्छतेचे नियम धाब्यावर बसवून रस्त्याच्या कडेला कचरा फेकणाऱ्या हॉटेल मालकाला नगरसेवक नितीन जाधव यांनी चांगलाच हिसका दाखवला आहे.

बेळगावमधील टिळकवाडी परिसरातील बुधवार पेठ येथे असलेल्या एका इडली-वडा कॅन्टीनचा कामगार मध्यरात्री रस्त्याच्या कडेला कचरा फेकत असल्याचे काही सजग नागरिकांच्या लक्षात आले. या नागरिकांनी तातडीने स्थानिक नगरसेवक नितीन जाधव यांना माहिती दिली. माहिती मिळताच नितीन जाधव यांनी महानगरपालिकेच्या आरोग्य निरीक्षकांसह घटनास्थळी धाव घेतली असता कचरा टाकल्याचे उघड झाले. या पार्श्वभूमीवर महानगरपालिकेच्या घनकचरा व्यवस्थापन नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी संबंधित कॅन्टीन मालकाला २,००० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला.
केवळ महानगरपालिकेची कचरा गाडी आल्यावरच कचरा द्यावा, अन्यथा कायदेशीर कारवाई केली जाईल, असा इशारा नगरसेवक नितीन जाधव यांनी दिला. “सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकणे हा गुन्हा असून स्वच्छतेबाबत शिस्त पाळणे आवश्यक आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले. या मोहिमेत आरोग्य निरीक्षक लक्ष्मण मोहिते आणि पर्यवेक्षक गजानन मुळीक उपस्थित होते.


Recent Comments