Belagavi

डीजीपी रामचंद्रराव यांना सेवेतून बडतर्फ करण्याच्या मागणीसाठी बेळगावात भाजपचे आंदोलन

Share

अश्लील व्हिडिओ व्हायरल प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेले डीजीपी रामचंद्रराव यांना केवळ निलंबित न करता सेवेतून थेट बडतर्फ करावे, या मागणीसाठी आज बेळगावात भाजप महिला कार्यकर्त्यांनी निषेध मोर्चा काढला.

अश्लील व्हिडिओ प्रकरणामुळे पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाल्याचा आरोप करत गुरुवारी भाजप महिला आघाडीने रामचंद्रराव यांच्या विरोधात एल्गार पुकारला. शहरातील राणी चन्नम्मा चौकातून सुरू झालेली ही निषेध रॅली जिल्हाधिकारी कार्यालयावर धडकली. याप्रसंगी जिल्हाधिकाऱ्यांच्या माध्यमातून राज्यपालांना निवेदन सादर करून कठोर कारवाईची मागणी करण्यात आली.

यावेळी भाजप नेत्या उज्वला बडवनाचे यांनी कडक शब्दांत टीका केली. “आठ वर्षांपूर्वी रामचंद्रराव बेळगावमध्ये आयजीपी असतानाच हे कृत्य घडले आहे. अशा भ्रष्ट वृत्तीच्या अधिकाऱ्याला केवळ निलंबित करून चालणार नाही, तर त्यांना तात्काळ बडतर्फ करून निवृत्तीवेतनासह सर्व शासकीय सोयीसुविधा बंद कराव्यात,” असे त्यांनी ठणकावून सांगितले. तसेच काँग्रेस सरकार अशा गुन्हेगारांना पाठीशी घालत असल्याचा आरोपही त्यांनी केला.

डीजीपी रामचंद्रराव यांच्यावर कडक कायदेशीर बडगा उगारून पीडित महिलांना न्याय द्यावा, अशी मागणी डॉ. सोनाली सरनोबत यांनी केली. काँग्रेसच्या राज्यात महिलांना सुरक्षा उरलेली नाही, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली. या आंदोलनात डॉ. सोनाली सरनोबत, लीना टोपन्नवर, निर्मला हिरेमठ, सविता गुडकाई यांच्यासह शेकडो महिला कार्यकर्त्यांनी सहभागी होऊन आपला रोष व्यक्त केला.

Tags: