Belagavi

भगवान बुद्धांचा पुतळा बसवण्यासाठी विविध विभागांनी समन्वय साधावा

Share

बेळगावच्या ऐतिहासिक किल्ला तलावात भगवान बुद्धांचा पुतळा लवकरात लवकर बसवण्यात यावा, या मागणीसाठी ‘महाननायक डॉ. बी.आर. आंबेडकर कुंदानगरी सेवा संघ चलवादी महासभे’च्या वतीने आज तीव्र निदर्शने करण्यात आली.

या आंदोलनादरम्यान ‘इन न्यूज’शी बोलताना संघटनेचे नेते दुर्गेश मेत्री यांनी प्रशासनावर सडकून टीका केली. ते म्हणाले की, “२०१६ मध्येच बेळगाव महानगरपालिकेने किल्ला तलावात भगवान बुद्धांचा पुतळा बसवण्यासंदर्भात अधिकृत ठराव मंजूर केला आहे. मात्र, जिल्हा प्रशासन, महानगरपालिका आणि सार्वजनिक बांधकाम विभाग हे एकमेकांकडे बोट दाखवून जबाबदारी झटकत आहेत. प्रशासनाच्या या वेळकाढू धोरणामुळे बुद्ध पुतळ्याचे काम रखडले आहे.”

किल्ला तलावात बुद्ध पुतळा बसवल्यास हे एक मोठे पर्यटन स्थळ म्हणून विकसित होईल. यामुळे शहराच्या सौंदर्यात भर पडण्यासोबतच महानगरपालिकेच्या महसुलातही वाढ होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले. जर जिल्हा प्रशासनाने तातडीने सर्व विभागांची समन्वय बैठक घेऊन कार्यवाही सुरू केली नाही, तर भविष्यात मोठे आंदोलन छेडले जाईल, असा इशारा मेत्री यांनी दिला.

या प्रसंगी प्रवीण कांबळे, गणेश मेत्री, देवप्पा कांबळे, चेतन कोलकार, शंकर कांबळे, अमित कांबळे, अजित कांबळे यांच्यासह अनेक कार्यकर्ते आणि पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Tags: