Belagavi

२३ जानेवारीला नेताजी सोसायटीचा रौप्य महोत्सव सोहळा

Share

बेळगाव येथील नेताजी सुभाषचंद्र बोस को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या वतीने नेताजी जयंती आणि संस्थेच्या रौप्य महोत्सवानिमित्त २३ जानेवारी रोजी भव्य सोहळ्याचे आयोजन करण्यात आल्याची माहिती संस्थेचे संस्थापक आणि ज्येष्ठ वकील मारुती झिरली यांनी दिली.

नेहरू नगर येथील केएलई डॉ. बी. एस. जिरगे सभागृहात सकाळी ९.३० वाजता हा कार्यक्रम पार पडणार आहे. आमदार अभय पाटील यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन होणार असून माजी खासदार अण्णासाहेब जोल्ले अध्यक्षस्थान भूषवणार आहेत. या सोहळ्यात माजी मंत्री महंतेश कवटगीमठ यांच्या हस्ते ‘रौप्य महोत्सवी’ स्मरणिकेचे प्रकाशन केले जाईल. असे मारुती झिरली यांनी म्हटले.

या ऐतिहासिक प्रसंगी किरण आगडी, रमेश तुबची, डॉ. विनोद दोड्डण्णावार, प्रभाकर नागरमुनोळी यांच्यासह आठ जणांना ‘नेताजी सुभाषचंद्र बोस सेवा पुरस्कार-२०२६’ देऊन गौरविण्यात येणार आहे. तसेच संस्थेच्या उभारणीत मोलाचे योगदान देणाऱ्या पहिल्या पाच भागधारकांचा आणि ठेवीदारांचाही विशेष सत्कार केला जाईल. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे उत्तर प्रांत कार्यवाह राघवेंद्रजी कागवाड आणि माजी उपमुख्यमंत्री लक्ष्मण सवदी हे विशेष व्याख्यान देतील.

गेल्या २५ वर्षांपासून सहकार क्षेत्रात आदर्श सेवा देणारी ही संस्था या रौप्य महोत्सवाच्या निमित्ताने एक नवा टप्पा गाठणार आहे. या कार्यक्रमाला माजी खासदार प्रभाकर कोरे, रमेश कत्ती यांच्यासह जिल्ह्यातील अनेक मान्यवर उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाच्या शेवटी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली असल्याचे मारुती झिरली यांनी सांगितले. यावेळी नगरसेवक हनुमंत कोंगाळी व इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Tags: