भगवान गौतम बुद्ध आणि राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा बसवण्यासाठी ना-हरकत प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विरोधात दलित संघर्ष समिती (भीमवाद) च्यावतीने आज तीव्र निदर्शने करण्यात आली.

बेळगाव महानगरपालिकेच्या ठरावानुसार किल्ला तलावात भगवान गौतम बुद्ध आणि केएलई चौकात राजर्षी शाहू महाराज यांचा पुतळा बसविण्यात यावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले. शहरातील डॉ. बी. आर. आंबेडकर उद्यानापासून निघालेला हा मोर्चा किल्ल्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयावर धडकला. आंदोलकांनी कार्यालयासमोर ठिय्या मांडून जोरदार घोषणाबाजी केली.
यावेळी बोलताना आंदोलकांनी सांगितले की, २०१६ च्या महानगरपालिका कौन्सिल बैठकीतच हे दोन्ही पुतळे बसवण्याबाबतचा ठराव मंजूर झाला आहे. मात्र, अद्यापही त्यावर कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही. महानगरपालिका अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाकडे बोट दाखवत आहेत, तर पीवीडब्ल्यूडी अधिकारी उडवाउडवीची उत्तरे देत आहेत. या पुतळ्यांच्या उभारणीसाठी पीवीडब्ल्यूडीची एनओसी मिळणे आवश्यक आहे. जोपर्यंत प्रादेशिक आयुक्त आंदोलनस्थळी येऊन आमची समस्या ऐकत नाहीत, तोपर्यंत आम्ही आंदोलन मागे घेणार नाही, असा इशारा आंदोलकांनी दिला आहे.
या आंदोलनात कल्लाप्पा राचण्णावार, रवी बस्तवाडकर, सिदराय मेत्री, संतोष कांबळे यांच्यासह दलित संघर्ष समिती भीमवादचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.


Recent Comments