बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल येथे मायक्रो फायनान्सच्या कर्जाचा डोंगर आणि वसुलीसाठी होणाऱ्या त्रासाला कंटाळून एका विवाहित महिलेने तलावात उडी मारून आपली जीवनयात्रा संपवली. आत्महत्येपूर्वी या महिलेने घराच्या भिंतीवर सुसाईड नोट लिहिली आहे.

बैलहोंगल तालुक्यातील आनिगोळ गावात ही हृदयद्रावक घटना घडली असून गौरव्वा नीलप्पा केंगानूर (३६) असे मृत महिलेचे नाव आहे. संसाराचा गाडा हाकण्यासाठी गौरव्वा यांनी विविध मायक्रो फायनान्स संस्थांकडून ७ ते १० लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. या कर्जाच्या परतफेडीसाठी फायनान्स कर्मचारी आणि संबंधित महिलांकडून त्यांना वारंवार मानसिक त्रास दिला जात असल्याची माहिती समोर आली आहे. याच त्रासाला कंटाळून गौरव्वा यांनी गावातील तलावात उडी घेऊन आत्महत्या केली.
सत्य समोर आणण्यासाठी गौरव्वा यांनी आत्महत्येपूर्वी घराच्या भिंतीवरच आपली कैफियत मांडली आहे. यामध्ये त्यांनी आपल्या मृत्यूला ‘संघा’च्या सुंमव्वा, मंजव्वा आणि कस्तुरी या तीन महिला जबाबदार असल्याचा थेट आरोप केला आहे. “आरुढ, बहिणीची नीट काळजी घे. सिद्धप्पा आरुढला दहावी पास कर, हीच माझी शेवटची इच्छा आहे,” असे भावूक आवाहन त्यांनी आपल्या चिठ्ठीत मुलांसाठी केले आहे.
या घटनेची माहिती मिळताच बैलहोंगल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस अधिक तपास करत आहेत. ऐन संसाराच्या उमेदीत असलेल्या महिलेने अशा प्रकारे जीव दिल्याने केंगानूर कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला असून संपूर्ण गावात हळहळ व्यक्त होत आहे.


Recent Comments