Belagavi

बेळगावमध्ये ओयासिस फर्टिलिटीतर्फे जननी यात्रेचा शुभारंभ

Share

बेळगावच्या सरदार हायस्कूल मैदानावर ओयासिस आयव्हीएफ आणि फर्टिलिटी जननी यात्रेनिमित्त आयोजित जनजागृती रॅली व मोफत वंध्यत्व निवारण शिबिराचे उद्घाटन उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांच्या हस्ते पार पडले.


अपत्यप्राप्तीसाठी संघर्ष करणाऱ्या दांपत्यांना आशेचा किरण दाखवणाऱ्या ओयासिस फर्टिलिटी केंद्राचे कार्य कौतुकास्पद असल्याचे प्रतिपादन उत्तर मतदारसंघाचे आमदार आसिफ सेठ यांनी केले. . राज्यातील प्रजनन दरात होणारी घट लक्षात घेता, योग्य माहिती आणि उपचारांची उपलब्धता हाच यावर उपाय असून ही यात्रा कुटुंबांना योग्य निर्णय घेण्यास मदत करेल, असे त्यांनी म्हटले.

या प्रसंगी बोलताना बेळगाव शहराचे पोलीस उपायुक्त नारायण भरमणी म्हणाले, आधुनिक जीवनशैलीतील ताण आणि आहार पद्धतीमुळे मातृत्वाच्या समस्या वाढत आहेत. अशा काळात अपत्यप्राप्तीसाठी ओयासिस फर्टिलिटीने सुरू केलेले प्रयत्न कौतुकास्पद आहेत. पूर्वी स्त्रियांच्या तुलनेत सध्या जन्मदर कमी होत असून अनेक देशांत यासाठी सवलती दिल्या जात आहेत. अशा स्थितीत अपत्यहीन दांपत्यांचे दुःख दूर करण्यासाठी ओयासिस फर्टिलिटीचे कार्य उत्तम असल्याचे त्यांनी म्हटले. लेकव्ह्यू हॉस्पिटलचे डॉ. गिरीश सोनवलकर यांनीही या उपक्रमाचे स्वागत करत जननी यात्रेच्या जनजागृती मोहिमेचे कौतुक केले.

ओयासिस फर्टिलिटी तज्ज्ञ डॉ. श्वेता सोनवलकर यांनी स्त्रियांनी योग्य वयात विवाह करण्याच्या महत्त्वावर भर दिला. आधुनिक जीवनशैली आणि विलंबाने पालकत्व स्वीकारण्याच्या निर्णयामुळे प्रजनन क्षमतेच्या समस्या वाढत असून वैज्ञानिक माहितीचा अभाव हे देखील याचे मुख्य कारण असल्याचे त्यांनी सांगितले. ओयासिस संस्था आयव्हीएफ, आययूआय, आयसीएसआय यांसारख्या आधुनिक उपचार पद्धती आणि प्रगत प्रयोगशाळेद्वारे वैयक्तिक निगा राखून सेवा देत असल्याचे त्यांनी सांगितले.

या कार्यक्रमाला एसबीजी आयुर्वेदिक कॉलेजच्या डॉ. विजया गवळी, डॉ. सईदा कादरी, विभागीय व्यवस्थापक सचिन कुमार, केंद्र व्यवस्थापक श्रीकांत कोली, मार्केटिंग मॅनेजर एम. एन. सलगर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. तत्पूर्वी, शहरातील कृष्णदेवराय सर्कल येथून सुरू झालेली ही जनजागृती रॅली प्रमुख मार्गावरून फिरून सरदार मैदानावर विसर्जित झाली.

Tags: