बेळगावमध्ये सोन्याप्रमाणेच खाडी देशांतून डिझेलची तस्करी करणारे एक मोठे आंतरराष्ट्रीय रॅकेट पोलिसांनी उघडकीस आणले आहे. केंद्र आणि राज्य सरकारची कोट्यवधी रुपयांची करचोरी करणाऱ्या या टोळीचा बेळगावच्या माळमारुती पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

या कारवाईत पोलिसांनी १७ लाख रुपये किमतीचे १७ हजार लिटर डिझेल आणि एक टँकर जप्त केला आहे. मुंबईहून बेळगावमार्गे बेंगळुरूला टँकरमधून डिझेलची तस्करी होत असल्याची खात्रीलायक माहिती मिळताच पोलीस निरीक्षक बी. आर. गडेकर यांच्या पथकाने ही धाडसी कारवाई केली. कोणत्याही वैध कागदपत्रांशिवाय या पेट्रोलियम उत्पादनाची वाहतूक केली जात असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे.
या प्रकरणी तुमकूर येथील टँकर मालक अरिहंतसह एका मोठ्या टोळीचा शोध लागला असून, खाडी देशांतून बेकायदेशीरपणे हे तेल भारतात आणले जात असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. या तस्करीमध्ये महाराष्ट्र आणि राजस्थानमधील गुन्हेगारांचा सहभाग असल्याचा संशय असून खाजगी जहाजांद्वारे हे तेल आणले जात असल्याची शक्यता आहे. हे तेल काळ्या बाजारात अर्ध्या किमतीत विकून महाराष्ट्र आणि कर्नाटकच्या विविध पंपांना पुरवले जात असल्याचा पोलिसांना संशय आहे.
बेळगावचे पोलीस आयुक्त भूषण बोरसे यांनी या प्रकरणाची माहिती देताना सांगितले की, या तस्करीचा तपास आंतरराष्ट्रीय स्तरावर केला जात आहे. या टोळीचा पूर्णपणे नायनाट करण्यासाठी विशेष पथके मुंबई आणि राजस्थानला रवाना करण्यात येणार असून लवकरच अनेक मोठे खुलासे होण्याची शक्यता भूषण बोरसे यांनी व्यक्त केली.


Recent Comments