अथणी येथील साई ज्योती पॅरामेडिकल कॉलेज आणि संशोधन केंद्रात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याच महाविद्यालयातील एका प्राध्यापकाने लग्नाचे आमिष दाखवून एका विद्यार्थिनीचे अपहरण केल्याचा आरोप होत आहे. याप्रकरणी मुलीच्या पालकांनी पोलिसांत धाव घेतली असून शोधमोहीम तीव्र करण्यात आली आहे.
अथणी शहरातील साई ज्योती पॅरामेडिकल कॉलेजमध्ये शिक्षण घेणाऱ्या एका विद्यार्थिनीला प्रेमजाळ्यात ओढून त्याच कॉलेजच्या प्राध्यापकाने लग्नाचे आमिष दाखवून पळवून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. कागवाड तालुक्यातील उगार गावचा रहिवासी असलेला पवनकुमार शीलगार हा २८ वर्षीय अविवाहित प्राध्यापक या कृत्यात सामील असल्याचे तक्रारीत म्हटले आहे.
८ जानेवारी रोजी संबंधित प्राध्यापक विद्यार्थिनीचे अपहरण करून पसार झाला. या प्रकरणी मुलीच्या पालकांनी अथणी पोलीस ठाण्यात रीतसर तक्रार दाखल केली आहे. घटनेला १० दिवस उलटून गेले तरी अद्याप दोघांचा कोणताही ठावठिकाणा लागलेला नाही.
सध्या या दोघांचेही मोबाईल फोन बंद असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. आपली मुलगी सुखरूप परत येईल या आशेने तिचे पालक दररोज डोळ्यात पाणी आणून वाट पाहत आहेत.
या प्रकरणाचा तपास करण्यासाठी अथणीचे पोलीस निरीक्षक संतोष हळ्ळूर आणि उपनिरीक्षक गिरीमल्लप्पा उप्पर यांच्या नेतृत्वाखाली विशेष पथक तयार करण्यात आले आहे. हे पथक सध्या प्राध्यापक आणि विद्यार्थिनीचा शोध घेत असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.


Recent Comments