Belagavi

बेळगावमध्ये रिक्षा चालकांचे भव्य आंदोलन

Share

बेळगावमध्ये रिक्षा प्रवासी दर सुधारित करण्याच्या मागणीसाठी आज रिक्षा चालक आणि मालक संघटनांच्या वतीने भव्य निषेध आंदोलन करण्यात आले. रिक्षा चालकांच्या हिताचा विचार करून दर निश्चित न केल्यास शहरात बेमुदत संप पुकारण्याचा इशारा यावेळी देण्यात आला.

आंदोलनाचे नेतृत्व करताना रिक्षा युनियनचे अध्यक्ष मन्सूर यांनी सांगितले की, २०१५ मध्ये जे दर होते, तेच दर २०२६ मध्येही लागू करणे अन्यायकारक आहे. सध्या सीएनजी आणि डिझेलचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे किमान भाडे ३० रुपयांऐवजी ५० रुपये आणि प्रति किलोमीटरचा दर ३० रुपये निश्चित करावा. जिल्हाधिकाऱ्यांनी रिक्षा चालकांशी चर्चा करूनच नवीन दर जाहीर करावेत, अशी मागणी त्यांनी केली.

यावेळी बसवराज अवरोळी यांनी प्रशासनावर टीका करताना सांगितले की, बेळगावमध्ये अनेक ठिकाणी नियमांचे उल्लंघन करून ‘रॅपिडो’ सारख्या सेवा सुरू आहेत. अशा अवैध वाहतुकीमुळे प्रामाणिक रिक्षा चालकांचे नुकसान होत आहे. याबाबत तक्रार करूनही अधिकारी कारवाई करत नाहीत. जर प्रशासनाने आमच्या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर संपूर्ण बेळगाव शहरात रिक्षा सेवा बंद ठेवून तीव्र आंदोलन छेडले जाईल.

आंदोलनानंतर रिक्षा चालकांनी आपल्या मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना सादर केले. या आंदोलनात बेळगाव शहरातील शेकडो रिक्षा चालक आणि विविध संघटनांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.

Tags: