बेळगावमध्ये येत्या २४ आणि २५ जानेवारी रोजी भव्य ‘हरे कृष्ण रथयात्रा’ आयोजित करण्यात आली आहे. इस्कॉनचे अध्यक्ष भक्तिरसामृत स्वामी महाराज यांनी या महोत्सवाच्या तयारीची माहिती दिली असून शहरात उत्साहाचे वातावरण आहे.

आंतरराष्ट्रीय कृष्णभावनामृत संघ बेळगावच्या वतीने २४ आणि २५ जानेवारी रोजी २८ व्या ‘हरे कृष्ण रथयात्रा महोत्सवा’चे आयोजन करण्यात आले आहे. शनिवारी बेळगावच्या मुख्य बाजारपेठेतून आणि प्रमुख मार्गांवरून श्री राधा-कृष्ण आणि निताई गौर सुंदर भगवान यांची रथयात्रा काढण्यात येणार आहे. या सोहळ्यात कर्नाटकसह विविध राज्यांतील आणि परदेशातील हजारो भाविक सहभागी होणार आहेत. रथयात्रा मार्गावर ५० हजारांहून अधिक प्रसादाच्या पाकिटांचे वाटप, आकर्षक रांगोळी सजावट आणि सांस्कृतिक चित्ररथ हे यंदाच्या महोत्सवाचे मुख्य वैशिष्ट्य असेल.
टिळकवाडी येथील इस्कॉन मंदिराच्या मागील मैदानावर दोन दिवस भव्य पंडालमध्ये विविध कार्यक्रम संपन्न होणार आहेत. यामध्ये वरिष्ठ संन्यासी आणि विद्वानांची प्रवचने, भक्ती संगीत तसेच मुलांसाठी सांस्कृतिक स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. या महोत्सवाच्या ठिकाणी गो-सेवा दालन, आध्यात्मिक ग्रंथ प्रदर्शन आणि दररोज रात्री सुमारे ५० हजार भाविकांसाठी ‘महाप्रसाद’ची व्यवस्था करण्यात आली आहे. आध्यात्मिक कार्यासोबतच समाजसेवेत अग्रेसर असलेल्या इस्कॉनच्या या भव्य रथयात्रेत सहभागी होऊन श्रीकृष्णाचा आशीर्वाद घ्यावा, असे आवाहन बेळगावच्या नागरिकांना करण्यात येत आहे.
पत्रकार परिषदेला राम दास, बलराम भक्त दास, नागेंद्र दास, निताई निमाय दास, अमृत कृष्ण दास, वदान्य चैतन्य दास, श्वेत निताई दास, श्री रामायण दास, कृष्णाश्रय दास आणि इतर सदस्य उपस्थित होते.


Recent Comments