भारतीय सैन्यात भरती होऊ इच्छिणाऱ्या तरुणांसाठी लक्ष्मीताई फाउंडेशनच्या वतीने मोफत प्रशिक्षणासह बेळगाव ग्रामीण क्षेत्रातील मुलांच्या भविष्यासाठी अनेक योजना राबवण्यात येत आहेत, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिली आहे.


सैन्य दलात भरती होऊ इच्छिणाऱ्या बेळगाव ग्रामीण मतदारसंघातील तरुणांसाठी लक्ष्मीताई फाउंडेशनच्या वतीने मोफत प्रशिक्षण आणि बेळगुंदी येथे सुसज्ज क्रीडांगण उभारले जाईल, असे आश्वासन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर यांनी दिले. कुद्रेमणी येथील कार्यक्रमात भारतीय सैन्यात निवड झालेल्या नऊ युवक-युवतींचा सत्कार करताना त्यांनी मुलांनी केवळ तांत्रिक कौशल्यापुरते मर्यादित न राहता मोठ्या अधिकारी पदांवर झेप घ्यावी, अशी इच्छा व्यक्त केली. पुढील वर्षी सैन्यात भरती होणाऱ्यांची संख्या १०० पेक्षा जास्त व्हावी, असे उद्दिष्ट त्यांनी यावेळी मांडले.

मतदारसंघात केवळ धर्माच्या नावावर राजकारण न करता प्रत्यक्ष विकासकामांवर आपला भर असल्याचे सांगत त्यांनी गावातील मंदिर बांधकाम आणि रस्ते विकासासाठी कोट्यवधींचा निधी मंजूर केल्याचे नमूद केले. फाऊंडेशनच्या माध्यमातून आजारी व्यक्तीच्या उपचारासाठी २० लाख रुपयांची मदत केल्याचा उल्लेख करत त्यांनी पालकांनी मुलांच्या शिक्षणासाठी आणि उज्वल भविष्यासाठी जागरूक राहण्याचे आवाहन केले. समाजसेवेच्या आणि विकासाच्या या कार्यात सर्वांनी सहकार्य करावे, अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

या प्रसंगी कराटेमध्ये यश मिळवलेल्या मुलांचाही गौरव करण्यात आला. त्यानंतर गावातील नायक गल्ली येथील रस्ते विकास कामाचे पूजन करण्यात आले. या कार्यक्रमाला काडा अध्यक्ष युवराज कदम, बाळू देसूरकर, विनायक पाटील, दीपक पाटील, अरुण देवन, वैजनाथ राजगोळकर, विमल साकरे, शुभांगी राजगोळकर, सुमित्रा मिर्जी, लता शिवणगेकर, शंकर पाटील, प्रकाश यरोळकर, वैशाली खांडेकर आणि ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Recent Comments