बेळगाव दक्षिण विधानसभा मतदारसंघातील एल अँड टी कंपनीच्या कामांविरुद्ध भाजप अचानक आक्रमक झाली आहे, मात्र हे केवळ एक ढोंग आहे. गेल्या काही वर्षांपासून जेव्हा बेळगावची जनता या त्रासामुळे होरपळत होती, तेव्हा हे नेते गप्प का होते? असा सवाल राजकुमार टोपन्नावर यांनी उपस्थित करत आमदार अभय पाटील यांच्यावर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला.

राजकुमार टोपन्नावर पुढे म्हणाले की, संपूर्ण कर्नाटकात पाणी खासगीकरणाला विरोध होत असताना एल अँड टी कंपनीला कंत्राट देण्याचा निर्णय भाजप सरकारनेच घेतला होता. त्यामुळे आज उद्भवलेल्या सर्व समस्यांना भाजप सरकारच पूर्णपणे जबाबदार आहे. स्मार्ट सिटी योजनेच्या अंमलबजावणीवेळी महापालिका आणि संबंधित विभागांमध्ये कोणताही ताळमेळ नव्हता. केवळ घाईघाईने रस्ते आणि पदपथ बांधल्यामुळे आज ही दुरावस्था झाल्याचा आरोप त्यांनी केला.
शहरात नुकतेच तयार केलेले रस्ते पुन्हा खोदले जात आहेत. यामुळे नागरिकांना एकाच कामासाठी दोनदा कर भरावा लागत आहे. एकदा रस्ते बांधण्यासाठी आणि दुसऱ्यांदा तेच रस्ते तोडून दुरुस्त करण्यासाठी. जर भाजपला खरोखरच जनतेची काळजी होती, तर लोकांचा विरोध असतानाही या कंपनीला कंत्राट का दिले? असा परखड प्रश्न त्यांनी विचारला आहे.
या सर्व अव्यवस्थेवर इतकी वर्षे मौन का पाळले आणि सार्वजनिक पैशांचा जो दुरुपयोग झाला त्याला जबाबदार कोण, अशी विचारणा त्यांनी केली. बेळगाव दक्षिणमधील इतर निकृष्ट आणि अशास्त्रीय कामांविरुद्धही भाजप असेच आंदोलन करणार का? असा सवाल करत, जनतेची दिशाभूल करण्याचे हे नाटक आता बंद करावे, अशा शब्दांत त्यांनी आपली नाराजी व्यक्त केली.


Recent Comments