बेळगाव जिल्ह्यातील सवदत्ती तालुक्यातील धुपदाळ गावात मध्यरात्री चोरट्यांनी आपले हातसफाई दाखवली आहे. गावातील सुप्रसिद्ध बीरेश्वर मंदिराचे दरवाजे तोडून चोरट्यांनी चांदी आणि सोन्याचे दागिने लंपास केले असून, देवाची मूर्तीही सोबत नेल्याने ग्रामस्थांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे.

धुपदाळ गावातील बीरेश्वर मंदिरात ही चोरीची घटना घडली. मंदिराच्या गाभाऱ्याचे कुलूप तोडून आत प्रवेश केलेल्या चोरट्यांनी सुमारे २ किलो वजनाचा चांदीचा घोडा आणि सोन्याच्या दोन माळा चोरल्या आहेत. मंदिरातील मौल्यवान दागिन्यांवर पाळत ठेवून चोरट्यांनी अत्यंत शिताफीने हे कृत्य केले.

दागिन्यांसोबतच चोरट्यांनी बीरेश्वर देवाची कांस्यमूर्तीही पळवून नेली होती. मात्र, चोरी करून पसार होत असताना त्यांनी गावाच्या वेशीवर ही मूर्ती फेकून दिली आणि तिथून पळ काढला. पहाटे हा प्रकार उघडकीस आल्यानंतर परिसरात मोठी खळबळ उडाली आहे.
या घटनेची माहिती मिळताच सवदत्ती पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आहे. मंदिरात झालेली ही चोरी आणि देवाच्या विटंबनेमुळे ग्रामस्थांमध्ये भीतीसह संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. चोरट्यांचा तातडीने शोध घ्यावा, अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.


Recent Comments