बेळगाव तालुक्यातील सांबरा येथील विमानतळाच्या विस्तारीकरणासाठी जमिनी दिलेल्या शेतकऱ्यांना योग्य मोबदला न मिळाल्याने प्रशासनावर नामुष्की ओढवली आहे. बेळगावच्या उपविभागीय अधिकाऱ्यांची सरकारी गाडी आणि कार्यालयातील संगणक जप्त करण्याची कारवाई मंगळवारी न्यायालयाच्या आदेशानुसार करण्यात आली.

सन २०१० मध्ये बेळगाव विमानतळाच्या विकासासाठी विशेष भूसंपादन अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या शेतजमिनी संपादित केल्या होत्या. मात्र, गेल्या १६ वर्षांपासून या शेतकऱ्यांना कोणताही मोबदला देण्यात आला नव्हता. या प्रकरणी शेतकऱ्यांनी न्यायालयात धाव घेतली होती. बेळगावच्या तिसऱ्या दिवाणी न्यायालयाने या प्रकरणाची गंभीर दखल घेत उपविभागीय अधिकारी कार्यालयातील साहित्य जप्त करण्याचे आदेश दिले.
शेतकऱ्यांच्या जमिनी १६ वर्षांपूर्वीच संपादित करण्यात आल्या होत्या. या संदर्भात दोन वर्षांपूर्वीच न्यायालयाने सहा शेतकऱ्यांना तातडीने मोबदला देण्याचे निर्देश दिले होते. मात्र, प्रशासनाने याकडे दुर्लक्ष केल्याने अखेर ही जप्तीची कारवाई करावी लागली, अशी माहिती वकील एस. एस. शेट्टर यांनी दिली.


Recent Comments