Belagavi

विजयनगरमधील ‘श्री गणेश फंडा’कडून ३ कोटींची फसवणूक

Share

बेळगावमधील विजयनगर, जनता कॉलनी येथील ‘श्री गणेश मासिक वार्षिक फंड’ चालवणाऱ्या नाईक कुटुंबाने सुमारे ३ कोटी रुपयांची फसवणूक केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आपले पैसे परत मिळवून द्यावेत आणि संबंधितांना अटक करावी, या मागणीसाठी विजयनगर येथील रहिवाशांनी मंगळवारी बेळगाव शहर पोलिस आयुक्तांना निवेदन दिले.

पोलिस आयुक्त भूषण गुलाबराव बोरसे यांनी रहिवाशांचे निवेदन स्वीकारून, या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेच्या सहाय्यक पोलिस आयुक्तांकडे सोपवला असल्याचे सांगितले. तसेच, फसवणूक करणाऱ्यांविरुद्ध तत्काळ कायदेशीर कारवाई करण्याचे आश्वासन दिले.

विजयनगर येथील दिलीप खाचू नाईक, दर्शन दिलीप नाईक, गीता दिलीप नाईक आणि प्रांजल दर्शन नाईक यांनी २०१८ मध्ये हा फंड सुरू केला होता. सुरुवातीची सहा वर्षे व्यवहार सुरळीत चालल्याने नागरिकांचा त्यांच्यावर विश्वास बसला. मात्र, गेल्या एका वर्षापासून फंडधारकांची रक्कम परत देण्यास नाईक कुटुंबाने टाळाटाळ सुरू केली. फोन केल्यास प्रतिसाद न देणे किंवा घरी गेल्यावर अपमानास्पद वागणूक देणे, असे प्रकार सुरू झाले आहेत. या फंडात प्रामुख्याने मजूर, रोजंदारी कामगार आणि घरकाम करणाऱ्या महिलांनी आपल्या घामाचा पैसा गुंतवला होता. ३ ते ३.५ कोटी रुपयांचा हा घोटाळा असून, सध्या दिलीप आणि दर्शन नाईक हे दोघेही बेपत्ता आहेत.

प्रसारमाध्यमांशी बोलताना स्थानिक रहिवासी साक्षी पेडणेकर यांनी सांगितले की, “मी स्वतः गेल्या सात-आठ वर्षांपासून दरमहा ७ हजार रुपये या फंडात भरत होते. सुरुवातीला व्यवहार चांगले असल्याने विश्वास बसला, पण आता आमची रक्कम बुडवण्याचा प्रयत्न केला जात आहे. नाईक यांच्या घरी विचारणा करायला गेल्यास त्यांची पत्नी अर्वाच्य भाषेत बोलून आम्हाला हाकलून देते.” यामुळे याप्रकरणी पोलीस विभागाने लक्ष घालून आपल्याला न्याय मिळवून द्यावा अशी मागणी त्यांनी केली.

पोलिस आयुक्त भूषण बोरसे यांनी नागरिकांना धीर दिला असून, दोषींवर निश्चितपणे कारवाई केली जाईल, असे स्पष्ट केले आहे. निवेदन सादर करताना विजय नगरसह विविध भागातील ठेवीदार उपस्थित होते.

Tags: