बेळगावच्या संजीवनी फाउंडेशनमध्ये संस्थेच्या केअर सेंटरमध्ये उपचार घेत असलेल्या रुग्णांसाठी आयोजित करण्यात आलेला वार्षिक क्रीडामहोत्सव केवळ मनोरंजनाचे साधन न ठरता, त्यांच्या आत्मविश्वासात भर टाकणारा आणि पुनर्वसनाचा एक महत्त्वाचा भाग ठरला.


दरवर्षीप्रमाणे यंदाही संजीवनी फाउंडेशनने आपल्या केंद्रातील रुग्णांसाठी हा विशेष उपक्रम राबवला. खेळांमुळे केवळ शारीरिकच नव्हे, तर मानसिक स्थिरता आणि भावनिक आरोग्य सुधारते, या उद्देशाने या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये ५० हून अधिक रुग्णांनी उत्साहाने भाग घेतला. मैदानावर पार पडलेल्या थ्रो बॉल, चपलांची धावणे, लिंबू-चमचा, १०० मीटर रिले आणि धिम्या गतीने चालणे यांसारख्या स्पर्धांमध्ये रुग्णांमधील जिद्द दिसून आली. तसेच अंतर्गत भागात पार पडलेल्या कोलाज मेकिंग, मातीकाम आणि संगीत खुर्ची यांसारख्या सृजनशील स्पर्धांनी त्यांच्या कलागुणांना वाव दिला.

पोलीस उपायुक्त नारायण भरमणी आणि बेळगाव चेंबर ऑफ कॉमर्सचे माजी अध्यक्ष रोहन जुवळी यांनी क्रीडाज्योत प्रज्वलित करून या महोत्सवाचे उद्घाटन केले. यावेळी आकाशात रंगीबेरंगी फुगे सोडून आनंदाने कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. संजीवनी फाउंडेशनचे अध्यक्ष मदन बामणे यांनी पाहुण्यांचे स्वागत केले, तर सावित्री माळी यांनी परिचय करून दिला.

संस्थेच्या वतीने केंद्रातील रहिवाशांसाठी वर्षभर विविध उपक्रम राबवले जातात. खेळ हा त्यांच्या शारीरिक आणि मानसिक आरोग्यामध्ये सकारात्मक बदल घडवून आणणाऱ्या उपचार पद्धतीचाच एक भाग आहे. भविष्यात स्वतःच्या इमारतीत २०० रुग्णांना सेवा देण्याचे आमचे उद्दिष्ट आहे, असे संस्थेच्या संस्थापिका डॉ. सविता देगीनाळ यांनी प्रास्ताविकात म्हटले.

संजीवनी फाउंडेशन समाजासाठी अत्यंत मोलाचे आणि मानवतावादी कार्य करत आहे, अशा शब्दांत पोलीस उपायुक्त नारायण भरमणी यांनी कौतुक केले. या उपक्रमामुळे रुग्णांच्या आयुष्यात नवी उमेद निर्माण होईल, अशी प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली.
यावेळी उद्योजक रोहन जुवळी यांनी संस्थेच्या समर्पणाची प्रशंसा करत या सेवेचा विस्तार व्हावा, अशी सदिच्छा व्यक्त केली. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी वैष्णवी नेवगीरी, सरिता नाईक, पद्मा औषधकर आणि पुष्पा बेंडवाड यांच्यासह कर्मचारी वृंदाने परिश्रम घेतले.


Recent Comments