धारवाड शहरातील सरकारी बसेसवर गुटखा कंपन्यांच्या जाहिराती लावण्यास परवानगी देणाऱ्या परिवहन विभागाच्या निर्णयाचा एआयडीवायओ संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करण्यात आला.

शहरातील मुख्य बस स्थानक अर्थात सीबीटी बस स्थानकावर ऑल इंडिया डेमोक्रॅटिक युथ ऑर्गनायझेशनच्या कार्यकर्त्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी परिवहन मंत्री, विभागाचे अधिकारी आणि सरकारविरुद्ध जोरदार घोषणाबाजी केली. सरकारी बसेसच्या बाहेरील भागावर तरुणांच्या आरोग्याला घातक असणाऱ्या गुटखा कंपन्यांच्या जाहिराती लावण्यात आल्याने सर्वत्र संताप व्यक्त होत आहे.
बहुतेक शहर परिवहन बसेस गुटख्याच्या जाहिरातींनी भरल्या असून, या सरकारी बसेस आहेत की गुटखा कंपनीच्या जाहिरात बसेस, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडत आहे. जाहिरातींच्या पैशांसाठी सरकार इतक्या खालच्या थराला जाईल याची कोणी कल्पनाही केली नव्हती. याकडे परिवहन मंत्र्यांनी तातडीने लक्ष देऊन या जाहिरातींना परवानगी देणाऱ्या अधिकाऱ्याचा राजीनामा घ्यावा, अन्यथा मंत्र्यांनी स्वतः राजीनामा द्यावा, अशी मागणी यावेळी करण्यात आली.
आजचे हे आंदोलन केवळ प्रतिकात्मक असून, जाहिराती न हटवल्यास भविष्यात राज्यभर तीव्र लढा उभारला जाईल, असा कडक इशारा कार्यकर्त्यांनी यावेळी प्रशासनाला दिला.


Recent Comments