लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या उगार येथील श्री पद्मावती मंदिराच्या आवारात समुदाय भवन आणि आरसीसी काँक्रिटीकरण कामाचा प्रारंभ आमदार राजू कागे यांच्या हस्ते करण्यात आला.

या कामासाठी अल्पसंख्याक विभागाकडून ५० लाख आणि आमदार निधीतून १५ लाख, असा एकूण ६५ लाख रुपयांचा निधी खर्च करण्यात येणार आहे. मंगळवारी सकाळी श्री पद्मावती मंदिराच्या प्रांगणात कामाचे उद्घाटन केल्यानंतर आमदार राजू कागे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. श्री पद्मावती देवीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात, त्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी मंदिर प्रमुख शीतल पाटील प्रयत्नशील आहेत. या कार्यात सहकार्य मिळावे आणि देवीचा आशीर्वाद लाभवा या हेतूने आपण ही सेवा दिली असून, आयुष्यात राजकारण किंवा जातीभेद न करता समस्या घेऊन येणाऱ्या प्रत्येकाला न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे, असे त्यांनी म्हटले.
आमदार राजू कागे यांच्यासमोर दोन मागण्या मांडल्या असता, त्यांनी कोणताही संकोच न बाळगता तत्काळ निधी मंजूर केला. याबद्दल आम्ही ग्रामस्थ आणि भाविकांच्या वतीने त्यांचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया मंदिराचे प्रमुख आणि कर्नाटक राज्य जैन असोसिएशनचे उपाध्यक्ष शीतलगौडा पाटील यांनी व्यक्त केली.
कार्यक्रमाचे औचित्य साधून पुजारी अशोक उपाध्ये आणि भरत उपाध्ये यांनी मंत्रोपचारासह पूजा विधी पार पाडले. यावेळी पालगौडा पाटील, अण्णागौडा पाटील, दीपक पाटील, अभियंता आदेश होसवाडे, भरतेश खंडीराजुरी, दादा अळप्पणवर, सुरेश वसवाडे, अण्णासाहेब पांगरे, सुभाष खंडेराजुरी, अनिल सदलगे आणि कंत्राटदार संदीप खराडे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments