परदेशात मोठ्या पगाराची नोकरी देण्याचे आमिष दाखवून बेळगावच्या तीन तरुणांची सायबर टोळीने कंबोडियात फसवणूक केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

आकाश कागणीकर, ओमकार लोखंडे आणि संस्कार लोखंडे अशी या तरुणांची नावे असून बेळगाव पोलिसांच्या मदतीने त्यांची सुखरूप सुटका करण्यात आली आहे. बेळगावातील एका एजंटने या तरुणांना हॉंगकॉंगमध्ये १ लाख रुपये पगाराची डेटा एन्ट्री ऑपरेटरची नोकरी असल्याचे सांगून कंबोडियाला पाठवले. तिथे पोहचल्यावर त्यांना व्हॉट्सॲप आणि इंस्टाग्रामद्वारे सायबर फसवणूक करण्यासाठी जबरदस्ती करण्यात आली. या कामाला नकार दिल्यावर त्यांना एका खोलीत डांबून अतोनात मारहाण आणि इलेक्ट्रिक शॉक देऊन छळ करण्यात आला.
तरुणांच्या पालकांनी बेळगाव सीइएन पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर पोलीस आयुक्तांनी तातडीने कंबोडियातील भारतीय दूतावासाशी संपर्क साधला. कंबोडिया पोलिसांनी केलेल्या कारवाईत ५० हून अधिक तरुण ओलीस असल्याचे आढळले. बेळगाव सीइएन ठाण्याचे निरीक्षक जे. एम. कालीमिर्ची आणि त्यांच्या पथकाने या तरुणांना मायदेशी आणण्यासाठी महत्त्वाची भूमिका बजावली. सध्या बेळगाव पोलिसांनी फरार एजंटच्या अटकेसाठी विशेष पथक तयार केले आहे.


Recent Comments