दक्षिण काशी म्हणून प्रसिद्ध असलेल्या चिकोडी तालुक्यातील येडूर येथील श्री वीरभद्रेश्वर मंदिराचा आमूलाग्र जीर्णोद्धार आणि श्रीशैल जगद्गुरुंची ‘संचारी धर्म जागृती यात्रा’ २० जानेवारीपासून सुरू होत असल्याची माहिती श्रीशैल जगद्गुरु डॉ. चन्नसिद्धराम पंडिताराध्य शिवाचार्य यांनी बेळगावमध्ये दिली.

शुक्रवारी पत्रकार परिषदेत बोलताना जगद्गुरुंनी सांगितले की, येडूर येथील मंदिराला आता उत्तर आणि दक्षिण अशी दिव्य गोपुरे उभारण्यात आली आहेत. या यात्रेचा शुभारंभ २० जानेवारी रोजी बेळगावच्या गांधी भवन येथे होणार असून, या कार्यक्रमाचे उद्घाटन मंत्री लक्ष्मी हेब्बाळकर करणार आहेत. पालकमंत्री सतीश जारकीहोळी, जगदीश शेट्टार, प्रभाकर कोरे यांच्यासह अनेक लोकप्रतिनिधी यावेळी उपस्थित राहतील.
येडूर क्षेत्रात मार्चच्या पहिल्या आठवड्यात राजगोपूर लोकार्पण, महाकुंभाभिषेक, लक्षदीपोत्सव, कृष्ण आरती आणि पुरवंतांचा महामेळावा आयोजित करण्यात आला आहे. त्यापूर्वी संपूर्ण बेळगाव जिल्ह्यात पाच दिवसांची धर्म जागृती यात्रा काढली जाणार आहे. २१ जानेवारी रोजी सकाळी १० वाजता श्री भद्रकाळी वीरभद्रेश्वर सामूहिक तुलाभार आणि सामूहिक लिंगदीक्षा कार्यक्रम होणार आहे. या यात्रेच्या माध्यमातून गावोगावी प्रवचने आणि घराघरात जाऊन लिंगदीक्षेचे महत्त्व पटवून दिले जाईल.
या पत्रकार परिषदेला हुक्केरी हिरेमठाचे श्री चंद्रशेखर शिवाचार्य स्वामीजी, नूल मठाचे गुरुसिद्धेश्वर शिवाचार्य स्वामीजी यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.


Recent Comments